Fri, Jul 19, 2019 05:14होमपेज › Pune › आता वार्षिक ८५ हजार उत्पन्‍न असलेल्यांनाही मोफत उपचार 

आता वार्षिक ८५ हजार उत्पन्‍न असलेल्यांनाही मोफत उपचार 

Published On: Mar 01 2018 1:53AM | Last Updated: Mar 01 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील 430 धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी निर्धन आणि आर्थिक दुर्बल या घटकांच्या उत्पन्न मर्यादेत विधी व न्याय विभागाने वाढ केली आहे. आता वार्षिक उत्पन्न 85 हजार व त्यापेक्षा कमी असलेल्या रुग्णांना धर्मादाय रुग्णालयातून मोफत उपचार घेता येणार आहेत. तसेच 85 हजार ते एक लाख 60 हजाराच्या दरम्यान उत्पन्न असलेल्या रुग्णांना एकूण बिलाच्या 50 टक्के सूट मिळणार आहे. आजपासून सर्व राज्यांत या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

यापूर्वी धर्मादाय रुग्णालयात मोफत उपचार घेण्यासाठी रुग्णांचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 50 हजार होती. तर रुग्णालयाच्या एकूण बिलामध्ये 50 टक्के  सूट मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही एक लाख रुपये होती. मात्र, ही मर्यादा फार वर्षांपूर्वीची असल्याने, आता नागरिकांचे उत्पन्न वाढले असले तरी त्याच प्रमाणात  महागाई वाढल्यामुळे त्यामध्ये वाढ होणे गरजचे होते. यापूर्वी नागरिकांना 50 हजारांच्या आतील उत्पन्नाचे दाखले मिळण्यास कसरत करावी लागत होती. राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावानुसार ही वाढ करण्यात आली आहे.

विधी व न्याय विभागाने हे आदेश 23 तारखेला जारी केले आहेत. त्याचा लाभ राज्यातील सर्व पिवळे रेशन कार्ड धारक (निर्धन) आणि केशरी रेशन कार्ड धारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.60 लाख रुपयांच्या आत आहे अशा (आर्थिक दुर्बल) घटकांना होणार आहे. याबाबत दैनिक पुढारीने 24, नोव्हेंबरच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर त्याची अंमलबजावणी झाली आहे.

विधी व न्याय विभागाने निर्धन आणि आर्थिक दुर्बल या घटकांसाठी वाढवलेल्या उत्पन्न मर्यादेची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या सर्व रुग्णांनादेखील याचा लाभ मिळणार आहे. हा आदेश राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना कळविण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी दिली.

पुण्यात 57 धर्मादाय रुग्णालये

पुण्यात 57 धर्मादाय रुग्णालये असून त्यांना नवीन उत्पन्न मर्यादेची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. रुग्णालयात जेथे पूर्वीच्या उत्पन्न मर्यादेचे फलक लावण्यात आलेले आहेत, तेथे नवीन उत्पन्न मर्यादेची माहिती भरण्यास सांगितले आहे. तसेच त्याचा अहवाल पुणे कार्यालयास आठ दिवसांच्या आत पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांनी सादर करावयाचा आहे.  - नवनाथ जगताप, धर्मादाय उपायुक्त, पुणे.