Mon, Sep 24, 2018 21:45होमपेज › Pune › अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवास

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाही, शिवनेरीमधून मोफत प्रवास

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:49AMपुणे: प्रतिनिधी

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ तसेच इतर आरामदायी गाड्यांमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यास बुधवारी (दि. 16) मान्यता देण्यात आली. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, अशी माहिती रावते यांनी दिली आहे.  

रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली.  रावते म्हणाले, एसटीच्या ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’सह इतर सर्व अत्याधुनिक आणि आरामदायी गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत देण्याबाबत एसटी महामंडळ पूर्ण सकारात्मक आहे. याबाबत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या तसेच संभाव्य खर्चाची माहिती एसटी महामंडळास सादर करावी. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव सादर करुन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही सवलत योजना तातडीने लागू केली जाईल.