Wed, Apr 24, 2019 11:54होमपेज › Pune › गावोगावी मिळणार मोफत इंटरनेट

गावोगावी मिळणार मोफत इंटरनेट

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:03AMपुणे : नवनाथ शिंदे

जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी करून देत, दोन वर्ष मोफत नेटवर्क पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 800 ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सर्व्हिस देण्यात येणार आहे. इंटरनेट जोडणी आणि दोन वर्ष मोफत ब्राऊजिंगसाठी जिल्हा नियोजन मंडळातून पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एप्रिलपासून गावोगावी ‘बीएसएनएल’च्यावतीने ब्रॉडब्रँड कनेक्टिव्हीटीला सुरुवात केली जाणाार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत 800 गावांना इंटरनेटची जोडणी करून 60 एमबीपीएस वेगाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेला नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजनेद्वारे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन मंडळास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार दोन ते तीन दिवसांत पंचायत विभागाकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अल्पावधीतच दोन वर्षांसाठी बीएसएनएलद्वारे विविध गावांना मोफत नेटवर्किंग पुरविले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून गावोगावी पुरविण्यात आलेल्या ऑप्टीकल वायरद्वारे तत्काळ इंटरनेटची जोडणी करण्यात येणार आहे. दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यातील 800 गावांमध्ये इंटरनेटचे जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. त्यानंतर उरलेल्या गावांत जोडणीला प्राधान्य दिले जाणार आहे. इंटरनेट जोडणीच्या पहिल्या टप्प्यात बारामती, भोर, वेल्हा, मुळशी, जुन्नर, दौंड तालुक्यातील गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इंटरनेटची जोडणी मिळविण्यासाठी गावोगावच्या ग्रामपंचायतींना ठराव करावा लागणार आहे. तो ठराव पंचायत समितीकडे जमा केल्यानंतर इंटरनेट जोडणी केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील 800 गावांची नेटवर्किंग जोडणी झाल्यानंतर आणि ग्रामपंचायतींचे पत्र मिळाल्यानंतर बीएसएनएलला पहिल्या वर्षांसाठीचा निधी वर्ग केला जाणार आहे. 

जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या निधीतून बीएसएनएलच्या वतीने पहिल्या दोन वर्षांत मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर संबधित गावांना इंटरनेटचे बील भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना मुख्यालयात माहिती पाठविण्यासाठी होणारी तारांबळ थांबली जाणार आहे. तसेच गावोगावची जोडणी इंटरनेटने झाल्यास नागरिकांसह प्रशासनातील कर्मचारी अधिकार्‍यांना इ-मेल, जीआर, ऑनलाईन उतारे, दाखला तत्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Tags : Pune, Pune News, villages, Free internet access,