Thu, Apr 25, 2019 14:04होमपेज › Pune › गरिबांना मिळणार मोफत डायलिसिस उपचार

गरिबांना मिळणार मोफत डायलिसिस उपचार

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी

गरीब रुग्णांसाठी मोफत आणि नाममात्र दरांत डायलिसिस केंद्र स्थापन करण्याचे आवाहन राज्याच्या आयुक्‍तांनी देवस्थानांना केले होते. या आवाहनाला पुण्यातील जेजुरी आणि रांजणगाव या दोन देवस्थानांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही ठिकाणी डायलिसिस केंद्र उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील सामाजिक संस्था, देवस्थान आणि खासगी व धर्मादाय रुग्णालये यांंना आवाहन केले होते. यापैकी अनेक संस्थांनी डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदीलही दाखवला आहे. या नवीन उपक्रमानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ते चार डायलिसिस मशीन्स बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञ, मेंटेनन्स खर्च हे त्या जिल्ह्यातील धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांकडून पुरविण्यात येणार आहेत. 

सध्या किडनीचे (मूत्रपिंड) विकार आणि मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. किडनी निकामी झालेल्या रुग्णांना दर दोन दिवसाला डायलिसिस करून घ्यावे लागते. परंतु ही सुविधा जिल्हा किंवा शहरातील खासगी रुग्णालयांत उपलब्ध असून ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. खासगी रुग्णालयांत एका वेळचे डायलिसिस करण्यासाठी 1 हजार 500 ते 2 हजार रुपये खर्च येतो. अशा प्रकारे एका रुग्णाला आठवड्यात तीन वेळा म्हणजेच महिन्यातून 12 वेळा डायलिसिस करून घ्यावे लागते. त्यासाठी महिन्याकाठी रुग्णाला 20 ते 24 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांना परवडू शकत नाही.

काय आहे डायलिसिस

डायलिसिस म्हणजे रक्तातील अनावश्यक पदार्थ, क्रिअ‍ॅटिनीन, युरिया आदी दूर करून रक्त शुद्ध करणे होय. शरीरातील क्षारांचे प्रमाण (सोडियम, पोटॅशियम) योग्य ठेवणे, आम्लाचे प्रमाण योग्य ठेवणे होय.  हे काम शरीरातील दोन्ही किंवा एक किडनी करत असते. पण दोन्ही किडन्या निकामी झाल्यावर ते डायलेसिसद्वारे करण्यात येते. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकट्या पुण्यात सध्या दोन हजारांच्यावर रुग्ण डायलिसिसवर आहेत.