Mon, Mar 25, 2019 09:41होमपेज › Pune › पुणेकरांना आजपासून मोफत ‘वायफाय’ सेवा

पुणेकरांना आजपासून मोफत ‘वायफाय’ सेवा

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी, 

नागरिकांना इंटरनेटशी जोडून ठेवण्यासाठी, शासकीय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महापालिकेसह शासकीय संस्थांकडे करावयाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत, यासाठी स्मार्ट सिटीकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरात 150 ठिकाणी मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार आणि स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप या वेळी उपस्थित होते. ही सुविधा एल अँड टी आणि रेलटेल यांच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल इंडियाची घोषणा केली आहे. गतिमान व्यवहारांसाठी देशात सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अधिकाधिक नागरिकांनी करावा, यासाठी पहिल्या टप्प्यात 150 ठिकाणी मोफत वायफाय हॉट स्पॉट सुविधा सुरू केली जाणार आहे. 

हॉट स्पॉटच्या नेटवर्कमध्ये असणार्‍या नागरिकांना मोबाईलवर ही सुविधा वापरण्यासाठी वायफाय सेटिंगमध्ये जाऊन पुणे वायफाय पर्याय निवडावा लागणार आहे. त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबरवर आलेल्या मेसेजमधील ओटीपी नंबर टाकल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात  शहरातील 60 उद्याने, महापालिकेची 46 रुग्णालये, पुणे महापालिका भवन, निबंधक कार्यालयासह 7  शासकीय कार्यालये, 3 म्युझियम, गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, स्वारगेट एस. टी. स्थानक, ब्रेमेन चौक आणि 30 पोलिस ठाण्यांमध्ये वाय फाय सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या माध्यमातून शहरातील सुमारे 2 लाख 82 हजार कुटुंबातील व्यक्तींना डिजिटल साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती 2020 पर्यंत डिजिटल साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 512 केबीपीएसच्या स्पीडने 50 एमबी डाटा नागरिकांना वापरता येणार आहे. पालिका आणि राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या वेबसाईट अथवा ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी या वाय फाय, हॉट स्पॉटच्या ठिकाणी डाटाचे अथवा वेळेचे कुठलेही बंधन राहाणार नाही.

या सेवेचा गैरवापर होऊ नये; तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ही विशेष यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. लवकरच गुगल स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील वाय फाय, हॉट स्पॉटची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. गुगल स्टेशनच्या माध्यमातून ही सुविधा देणारे पुणे हे देशातील पहिले शहर ठरेल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ जगताप यांनी सांगितले.