Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Pune › वरिष्ठ निरिक्षकांचीही होणार ‘झाडाझडती’!

वरिष्ठ निरिक्षकांचीही होणार ‘झाडाझडती’!

Published On: Feb 01 2018 1:27AM | Last Updated: Feb 01 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

सहकारनगर पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची अफरातफर तब्बल तेरा वर्षानंतर उघड झाल्याने पोलिस दलात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षाला पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची तपासणी केली जाते. परंतु, ही तपासणी ही नावालाच होत आहे का ? असा प्रश्‍न यामुळे उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नेमका किती मुद्देमाल गेला याबाबत तपास सुरू होता. मंगळवारी तपास पूर्ण झाला आणि या अफरातफरीचे गौडबंगाल समोर आले. या गुन्ह्यात वरिष्ठ निरीक्षकांनी दुर्लक्ष केल्याने आरोपींनी गुन्हा केलेल्या काळातील वरिष्ठ निरीक्षकांची चौकशी होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

 सहकारनगर पोलिस ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदार मनोहर गंगाराम नेतेकर (60, रा. धायरी), जयवंत अमृत पाटील (59, रा. कर्वेनगर) यांना मंगळवारी अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर, कर्मचारी अलका गजानन इंगळे (52, रा. पुणे सातारा रोड, बिबवेवाडी) यांचा शोध सुरू आहे. 

मनोहर नेतेकर 2016 मध्ये तर जयवंत पाटील 31 ऑगस्ट 2017 रोजी सेवानिवृत्त झाले. तर, अलका इंगळे यांची नुकतीच बदली झाली. दरम्यान नेतेकर यांच्याकडून जयवंत पाटील यांनी दोन वर्षापूर्वी मुद्देमाल कारकून विभागाचा पदभार घेतला होता. त्यानंतर याठिकाणी काम करून ते 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले आहेत. त्यानंतर एका कर्मचार्‍याकडे अतिरिक्त कार्यभार असताना हा अफरातफरीचा प्रकार समोर आला. दरम्यान 2004 ते 2017 या कालावधीत मुद्देमालाची अफरातफर करण्यात आली आहे. ती एकाच वर्षात किंवा एकाच वेळी झालेली नाही. वर्षाला थोडा-थोडा मुद्देमाल गायब करण्यात आला असे पोलिस दलातील काही जानकारांनी सांगितले. वर्षाच्या शेवटी प्रत्येक पोलिस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची तपासणी केली जाते. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाहिले जाते. परंतु, तरीही तब्बल 11 लाखांची अफरातफर उघड होण्यास 13 वर्षांचा कालावधी जावा लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे योग्य तपासणी होत नाही का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सर्व पोलिस ठाण्यातील मुद्देमालाची तपासणी 

सहकारनगर पोलिस ठाण्यातील मुद्देमाल अफरातफरीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान याप्रकारानंतर सर्व पोलिस ठाण्यांना मुद्देमाल तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सहआयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. तसेच, झोन दोनमधील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्याकडील मुद्देमालाची तपासणी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. यासाठी एक अधिकारी व तीन कर्मचारी यांची विशेष पथक तयार केले आहे. हे पथक पंधरा दिवसात मुद्देमालाची पाहणी करून त्याचा अहवाल 10 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. 

नकारामुळे आला संशय 

पाटील, नेतेकर निवृत्त झाल्यानंतर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार एका कर्मचार्‍याकडे देण्यात आला होता. त्यानंतर त्याला कायम कार्यभार घेण्यास सांगण्यात आले. परंतु, तो कर्मचारी कायमचा कार्यभार घेण्यास नकार देऊ लागला. त्यावेळी वरिष्ठांना काही तरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानंतर या मुद्देमालाची चौकशी सुरू केली. दोन महिन्यापासून तपासणी सुरू होती. त्यानंतर तेरा वर्षात 11 लाखांचा मुद्देमाल गायब असल्याचे समोर आले.