Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Pune › चौदा पिस्तुलांचा यूपी ते पुणे प्रवास

चौदा पिस्तुलांचा यूपी ते पुणे प्रवास

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या चौदा पिस्तुंलांचा प्रवास हा खाजगी ट्रॅव्हल्समधून झाल्याचे समोर आले आहे. तर, धक्कादायक बाब म्हणजे, पैशांच्या व्यवहारातून सराईत एकाला संपवणार होता, अशी माहितीही प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, 12 गावठी बनावटीचे लोखंडी कट्टे तसेच 25 काडतुसे जप्त केली आहेत.

संतोष विनायक नातू (वय 42, रा. महर्षीनगर, स्वारगेट) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील घरफोड्या, सोन साखळी तसेच वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठांनी हद्दीत गस्त वाढविली आहे. तसेच, ‘वॉन्टेड’ आरोपी व सराईतांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकातील कर्मचारी परवेज जमादार यांना बातमीमार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार पिस्तूल विक्रीसाठी स्वारगेट परिसरात येणार आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त पकंज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, तसेच दरोडा प्रतिबंधक पथकातील सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व कर्मचार्‍यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे पिस्तूल मिळाले. पोलिसांनी आणखी सखोल चौकशी केली असता, त्याने काही पिस्तूल घरी ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 14 पिस्तूल आणि 25 काडतूसे जप्त केली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. संतोष नातू हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर, मारहाण व जुगार अ‍ॅक्टनुसार असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. 

अशी आणली पिस्तुले
संतोष हा खाजगी वाहनाने उत्त्तर प्रदेशातील एका शहरात  सकाळी पोहचला. त्याने चौदा पिस्तूल व 25 काडतूसे विकत घेऊन बॅगेत ठेवली. त्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्स पकडली. या ट्रॅव्हल्समधून तो झांसी येथे आला. तेथून तो इंदोरमध्ये आला. तसेच, ट्रॅव्हल्सने पुण्यात रात्रीच्या वेळी पोहचला. तेथून तो घरी गेला. दरम्यान तो पैशांच्या व्यवहारातून एकाला ठार मारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इतर पिस्तूल हे विक्रीसाठी आणल्याची माहिती आहेे. दरम्यान त्याने उत्त्तरप्रदेशमधून पिस्तूल आणलेल्या माहिती मिळाली असून, त्याच्या शोधासाठी एक पथक रवाणा करण्यात आले आहे. दीड महिन्यापूर्वीच त्याला पिस्तूलासह पकडले होते. त्यावेळीही त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त केली होती.