Thu, Sep 20, 2018 01:54होमपेज › Pune › ताटातूट झालेल्या माय-लेकांची चार वर्षांनंतर भेट  

ताटातूट झालेल्या माय-लेकांची चार वर्षांनंतर भेट  

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:25AMयेरवडा : वार्ताहर

पश्‍चिम बंगालमधून  चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अखेर येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात शोध लागला. चार वर्षांनंतर आपल्या पोटच्या गोळ्याला भेटताच  त्याच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले. रुग्णालयातील समाजसेवकांनी  माय-लेकांची भेट घडवून आणली.

लालू (नाव बदलले आहे) हा तरुण उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलिस स्टेशनमार्फत दि.3 जूलै 2018 ला दाखल झाला.  तो दाखल झाल्यापासून वॉर्डातील मनोविकार तज्ज्ञ परिचारिक सचिन थोरात व समाजसेवा अधीक्षक किरण कोरे यांनी रुग्णास वारंवार बोलके करून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लालू काहीच माहिती सांगत नव्हता. वारंवार रुग्णाच्या संपर्कात राहिल्यानंतर लालूचा चुलत भाऊ मुंबईत असल्याचे समजले. थोरात व कोरे यांनी मुंबईच्या चुलत भावास संपर्क करून लालूची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयामार्फत पश्‍चिम बंगाल येथील दुर्गापूर गावच्या प्रधान (नगरसेवक) यास संपर्क साधून लालूबाबत चौकशी केली व लालूच्या आई -वडिलास लालू हा येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. लालू हा घरातून चार वर्षांपासून पळून गेल्याचे त्याच्या आईकडून कळाले. तेव्हापासून आपण त्याला शोधत असल्याचेही तिने सांगितले. लालूच्या आईस पश्‍चिम बंगालहून महाराष्ट्रात येण्यास रुग्णालयामार्फत सांगण्यात आले. आठ दिवसांनंतर लालूची आई येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाली. तिने लालूला बघितल्या बघितल्या ओळखले. त्याला पहाताच लालूच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू अनावर झाले. माय-लेकांची भेट घडवून आणण्याकामी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अभिजित फडणीस, वरिष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ.भालचंद्र डोंगळीकर, मनोविकार तज्ज्ञ जयंत जोशी, समाजसेवा अधीक्षक किरण कोरे, मनोविकार तज्ज्ञ परिचारिका सचिन थोरात, अधिपरिचारिका मेघा कोकणे, वॉर्डातील सर्व पुरुष परिचारक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.