Sun, Oct 20, 2019 02:32होमपेज › Pune › बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी चार हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी चार हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

देशभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणार्‍या बिटकॉईन क्रिप्टो करन्सी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मास्टरमाईंड अमित भारद्वाजसह नऊ जणांवर चार हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

याप्रकरणी अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय 35), काजल जितेंद्र शिंगवी (25, रा. महर्षीनगर), व्यास नरहरी सापा (46, रा. भवानी पेठ), विवेककुमार महेंदरकुमार भारद्वाज (31),  साहिल श्रीओमप्रकाश बागला (28, रा. नवी दिल्ली), निकुंज वीरेंद्रकुमार जैन (29, रा. नवी दिल्ली), हेमंत विश्‍वास सूर्यवंशी (51, रा. बाणेर), हेमंत चंद्रकांत भोपे (46, रा. डीएसके विश्‍व, धायरी) पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (40, रा. नवी दिल्ली) या नऊ जणांना अटक केलेली आहे. 

आरोपींनी प्रत्येक महिन्याला 0.1 टक्के बिटकॉईन असे 18 महिन्यात 1.8 बिटकॉईनचा परतावा देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जानेवारी 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तर, त्यानंतर निगडी पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांच्या समांतर तपासासाठी दोन विशेष पथके तयार करून सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक राधिका फडके, मनीषा झेंडे व त्यांचे पथक करत होते. बिटकॉईनचा मास्टरमाईंड अमित भारद्वाजला दिल्ली विमानतळावरून अटक केली. तर इतरांना देशातील विविध भागातून अटक केली होती. त्यांच्याकडे तपास सुरू आहे.  

दुबईत कोट्यवधीची मालमत्ता 

बिटकॉईनमधील गुंतवणूक केलेल्या पैशातून अमित भारद्वाज आणि त्याच्या भावांनी दुबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळख असलेल्या बुर्ज खलिफा या टॉवरमध्ये पाच कोटी 10 लाख रुपयांचा फ्लॅट तसेच जुबेरा लेक टॉवर्स येथे 17 कोटी रुपयांचे 10 हजार चौरस फुटाची सात कार्यालये, मरिन प्रिन्सेस टॉवर येथे दोन कोटी 12 लाख रुपयांचा फ्लॅट, तमानी टॉवर येथे 3.40 कोटी रुपयांची चार कार्यालये, खरेदी केल्याचे समोर आले आहे.