Sun, Jul 21, 2019 06:08होमपेज › Pune › डीएसकेंच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके

डीएसकेंच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी 

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पैसे परत करण्याच्या नावाखाली दिलेली वेळ न पाळणार्‍या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले संरक्षण आज काढून घेतले. त्यानंतर पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन करून ही पथके डीएसकेंना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. ते डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. 

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी, मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 10 ऑक्टोबर 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंंतर पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात 50 कोटी भरण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना पाच दिवस पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यानंतर आता डीएसके यांनी बुलडाणा अर्बन बँकेकडून दिल्या जाणार्‍या कर्जाचा हवाला देऊन  न्यायालयाकडून 13 फेब्रुवारीची मुदत घेतली होती. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील या आशेने न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 22 फेब्रुवारीपर्यंत आदेशासाठी राखून ठेवला होता.  मात्र, डीएसकेंनी बुलडाणा बँकेला ज्या दिलेल्या मालमत्ता, आधीच एका बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या असल्याचे सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंचे अटकेपासूनचे संरक्षण काढून घेतले. पोलिस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्यांचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 

डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4099 तक्रार अर्ज आले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 285 कोटी 21 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींप्रमाणे एकूण 39 कोटी 41 लाख 93 हजार 389 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांची एकूण 276 बँक खाती गोठवली आहेत; तर त्यांच्या तीनशेहून अधिक  मालमत्तांचा अहवाल लिलावासाठी जिल्ह्याधिकार्‍यांकडे पाठविला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकेचे संरक्षण काढून घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली  चार पथकांची स्थापना करून अटकेसाठी डीएसकेंची शोधाशोध सुरू केली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.