Sun, Sep 22, 2019 22:25होमपेज › Pune › वाघोलीचे चौघे अपघातात ठार

वाघोलीचे चौघे अपघातात ठार

Published On: Apr 22 2019 1:34AM | Last Updated: Apr 22 2019 1:51AM
शिरूर : प्रतिनिधी

शिरूर बाह्यमार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना पाचर्णे मळा येथे रविवारी (दि. 21) पहाटे घडली. यात दोन सख्ख्या भावांसह आई आणि 20 दिवसांच्या बालकांचा मृत्यू झाला. विवाहिता गंभीर जखमी झाली असून, चार वर्षांची बालिका सुखरूप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर शिरूरनजीक बंद पडलेल्या मालवाहू कंटेनरला (आरजे 05 जीबी 2433), कार (एमएच 12 क्यूडब्ल्यू 8502) पाठीमागून धडकली. या अपघातात किशोर माधव हके (वय 32), लिंबाजी ऊर्फ शुभम माधव हके (25), विमलबाई माधव हके (60) आणि 20 दिवसांचे नवजात बालक (सर्व सध्या रा. रायसोनी कॉलेज पाठीमागे, वाघोली, पुणे. मूळ रा. रामतीर्थ, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला; तर पुष्पा किशोर हके (वय 25) या जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हा अपघात झाल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत आवाज झाला होता.  दरम्यान, डिझेल संपल्याने कंटेनर रस्त्यावर बंद पडला होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली. सारंगकर यांच्यासह पोलिस कर्मचारी जनार्दन शेळके, रवींद्र पाटमास, कृष्णा व्यवहारे, संजय जाधव, उमेश भगत, करणसिंग जारवाल, हेमंत शिंदे, अभिषेक ओहोळ, सुरेश नागलोथ, गजानन जाधव आदींनी जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. रमेश चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, शिरूर पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचारी पोलिस नाईक उषा अनारसे, विद्या बनकर, मोनिका  जाधव, रेश्मा गाडगे, शीतळ गवळी यांनी त्या मुलीचा सांभाळ केला.

चार वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली

किशोर हके यांना मुलगा झाला होता. पत्नी व मुलगा माहेरी होते. त्यांना वाघोलीला घेऊन येण्यासाठी किशोर, शुभम, त्यांची आई विमलबाई आणि लहान भाची हे सर्व औरंगाबादला गेले होते. औरंगाबाद येथून रात्री कारने पत्नी व नवजात बाळ यांना घेऊन हे कुटुंबीय वाघोलीकडे येत होते. शिरूरजवळ येताच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात समृद्धी बजरंग हलगुडे ही चार वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. समृद्धीला फारसे लागले नाही.