होमपेज › Pune › संमतीने घटस्फोटाची दिवसाला चार प्रकरणे

संमतीने घटस्फोटाची दिवसाला चार प्रकरणे

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:57AMपुणे : महेंद्र कांबळे 

इंटरनेट, वॉट्सअ‍ॅप,  सोशल नेटवर्किंग साईट्समुळे पती-पत्नीमधील दुरावा वाढत असून इगो प्रॉब्लेम हेही घटस्फोटाचे कारण ठरत आहे. या प्रकारचे दावे दाखल करणार्‍यांमध्ये उच्चशिक्षित विशेषत: आयटी क्षेत्रातील दाम्पत्यांचे प्रमाण अधिक आहे. पुण्यात संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचे प्रमाण दिवसाला चार असून तीन वर्षात 3 हजार 865 प्रकरणे दाखल झाली आहेत. 

काही वर्षांपूर्वी पत्नीला माहेरहून पैसे आणण्यासाठी  सासरच्या मंडळींकडून देण्यात येणारा त्रास, नवर्‍याला असलेले दारूचे व्यसन, अनैतिक संबंध यासारख्या कारणांनी नात्याला सुरूंग लागायचा. या प्रकरणांमध्ये घटस्फोटासाठी एकतर्फी अर्ज दाखल व्हायचे. अशा प्रकारे दाखल दाव्यामध्ये घटस्फोट होण्यासाठी कालावधीही जास्त लागायचा. वर्षानुवर्षे दावे चालायचे. प्रथमत: न्यायालय दोघांत समुपदेशन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करी. त्यानंतर दोघे एकत्र राहणे शक्य नाही, असे निष्पन्न झाल्यावर खटला चालत असे.

मात्र ज्याला घटस्फोट द्यायचा नाही तो मुद्दाम तारखेस गैरहजर राहायचा. त्यामुळे खटला निकाली काढण्यास वेळ लागायचा. त्यातच अशा दाम्पत्याला मूल असल्यास त्याच्या ताब्यावरून दोघांत एकमत होत नसे. त्यामुळे त्याबाबतचा आदेशही न्यायालयाला द्यावा लागे. पोटगीबाबतही न्यायालयाला ठरवावे लागायचे. मात्र, आता परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल होत असल्याने न्यायालयाला आदेश देण्याची गरज उरत नाही. यामध्ये कोणत्या कारणावरून वेगळे राहणार आहोत, हे त्या दाम्पत्याने अर्जात नमूद केलेले असते. अर्जात कोणतेही आरोप नसतात. वैचारिक मतभेद अथवा ज्या कारणावरून वाद आहे, ते कारण नमूद करण्यात आलेले असते. मूल असल्यास ते कोणाच्या ताब्यात राहील, आईच्या ताब्यात असल्यास वडिलांनी त्याला कधी भेटायचे, त्याच्या शिक्षणाचा खर्च एकट्याने का दोघांनी करायचा, हेही ठरलेले असते. पोटगी एकदा द्यायची की दरमहा द्यायची हेही ठरलेले असते. त्यामुळे असे दावे तुलनेत लवकर निकाली निघतात. 

पूर्वी घटस्फोटासाठी एकतर्फी अर्ज जास्त दाखल होत. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला आहे. पती-पत्नीच्या परस्पर संमतीने दाखल होणार्‍या अर्जांचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन वर्षांत घटस्फोटासाठी 12 हजार 242 अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी 3 हजार 865 खटले परस्पर संमतीचे आहेत. म्हणजेच सुमारे 30 टक्क्यांहून अधिक दावे परस्पर संमतीने दाखल होत आहेत. अशा दाव्यांमध्ये निकालही तुलनेने लवकर लागतो. अगदी सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत घटस्फोट मंजूर होऊन असे दावे निकाली निघतात. 

अशा परिस्थितीत तत्काळ मिळू शकतो संमतीने घटस्फोट 

घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीच पती-पत्नी जर दीड वर्षापासून वेगळे राहत असतील, तर या परिस्थितीत त्यांना तत्काळ घटस्फोट मिळू शकतो. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारे सामंजस्य होत नसेल किंवा होण्याची शक्यता नसेल, तर अशा परिस्थितीत तत्काळ घटस्फोटाचा आदेश न्यायालय देऊ शकते. जर दोन्ही पक्षकारांनी पोटगी, मुलांचा हक्क आणि इतर मुद्दे सामंजस्याने सोडविले असतील, तर अशा परिस्थितीत न्यायालय तत्काळ घटस्फोट मान्य करू शकते. सहा महिन्यांचा कालावधी दोघांसाठी आणखी त्रासदायक, कष्टाचा ठरणार आहे असे वाटत असेल, तर याही परिस्थितीत त्या जोडप्याचा घटस्फोट तत्काळ मान्य करण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत.

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकमेकांच्या सांगण्यानुसार वर्तवणूक असायची. या जीवन शैलीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. संसारामध्ये मी म्हणेन तीच पूर्व दिशा या अनुषंगाने पती-पत्नीमध्ये स्पर्धा सुरू आहे. दोघेही कमावते असतील तर त्यांच्यात स्पर्धा अधिक दिसून येत आहे. नोकरी करणार्‍यांमध्ये संमतीने घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. नोकरी करताना बाहेर महत्त्व दिले जात असताना घरात अपेक्षेप्रमाणे महत्त्व दिले जात नसल्यानेही अनेक संसारांची घडी बिघडत चालली आहे. यावर तोडगा काढायचा झाल्यास घरात एकमेकांशी संवाद ठेवून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपले इगो प्रॉब्लेम दूर ठेवणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन जगत असताना केवळ घटस्फोट हा मार्ग असू शकत नाही. 
-अ‍ॅड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन