Mon, May 20, 2019 08:25होमपेज › Pune › चार वषार्र्ंत 60 पुणेकरांचा पुनर्जन्म

चार वषार्र्ंत 60 पुणेकरांचा पुनर्जन्म

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

उन्हाळा सुरू होताच शहरातील आगीच्या घटनांत वाढ होते. त्यात अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होऊन आर्थिक नुकसान होते. आग काही क्षणात अनेकांना बेघर करते. यात दुर्दैवाने काहीजण मृत्युमुखीही पडतात. तब्बल 40 लाख लोकसंख्येच्या शहरात अपुर्‍या मनुष्यबळ असतानाही अग्निशमन यंत्रणेला तारेवरची कसरत करत आगी आटोक्यात आणाव्या लागतात. अनेक घटनांत अग्निशामक दलाचे जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून अडकलेल्या नागरिकांची सुटका करतात.  गेल्या चार वर्षांत अशाच घटनात महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी 60 पुणेकरांचे प्राण वाचवत त्यांना एकप्रकारे नवीन आयुष्य मिळवून दिले आहे. 

यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या आगीत भस्म होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले. अनेकांना बेघर व्हावे लागले. अग्ग्निशामक जवानांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली. त्यानंतर शिवाजीनगर येथील एका दुकानातही आग लागली. या घटनेत दुर्दैवाने दोन कामगारांना जीव गमवावा लागला. गेल्या आठवड्यात एका इमारतीच्या इलेक्ट्रिक बोर्ड व वायरला आग लागली. यामुळे निर्माण झालेल्या धुरात एक ज्येष्ठ महिला अडकली. अग्निशमन जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून तिची सुखरूप सुटका केली. तर, दहा ते पंधरा नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. परिणामी जीवित हानी टळली.

अपुरे मनुष्यबळ अन् सुविधांचा अभाव असतानाही  स्वत:चा जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासोबतच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणार्‍या अग्निशमन यंत्रणेची कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. चार वर्षांत अशाप्रकारे अडकलेल्या  60 पुणेकरांचे प्राण जवानांनी वाचवले आहेत. एवढेच नव्हे तर कोट्यवधींची मालमत्ताही नष्ट होण्यापासून वाचवली आहे.  

तीन घटना अन् धावपळ

अग्निशमन विभागाकडे कर्मचार्‍यांची संख्या कमी असून, विविध भागांत 13 अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. त्यात केवळ 490 कर्मचारी आहेत. सध्या शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, सध्या 40 लाखांच्या जवळपास  लोकसंख्या आहे.  त्या तुलनेत महापालिकेकडे जवानांची ही संख्या  तोकडी आहे. एकाच दिवशी दोन किंवा तीन मोठ्या घटना घडल्यास कर्मचारी संबंधित ठिकाणी पोहचू शकत नाहीत.