Mon, Apr 22, 2019 06:05होमपेज › Pune › मला एक खून माफ करा

मला एक खून माफ करा

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात कुठेही एखाद्या कार्यक्रमानिमित्त गेल्यावर लगेचच मोबाईल पुढे येतात. वाकडे तिकडे होऊन फोटो काढण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यामुळे, उद्घाटनानंतर झालेल्या कामांची नीट पाहणीही करता येत नाही. नागरीकांनी डोळ्यांनी बघून देण्याचे सोडून दिले आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये ज्याने कॅमेरा आणला आहे, त्याचा मला खून करायचा आहे, आणि तो एक खून तुम्ही माफ करा, अशी परवानगी राष्ट्रपतींकडे मागणार असल्याचे खडेबोल सुनावत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईलवर फोटो घेण्यासाठी धडपडणार्‍यांची कानउघडणी केली. 

कात्रज येथील पुण्यश्‍लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर उद्यान आणि मोरे बागेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, बागेतून विविध सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. त्या टिकविण्याची संगोपनाची जबाबदारी नागरीकांची आहे. तेव्हा हे उद्यान आपल्या सोयीसाठी आहे. आपल्याच पैशांतून ते झाले आहे, त्याची काळजी घ्या. निवडणुकांच्या तोंडावर थापा मारल्या जातात. त्यावर जर मतदान होणार असेल, तर कोण काम करेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी उद्यानाच्या लोकार्पण प्रसंगी प्रचंड गर्दी झाली आणि राज ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी युवकांकडील मोबाईल कॅमेर्‍यांचा ‘क्‍लिकक्‍लिकाट’ सुरू झाला. त्यामुळे, उद्यानाची फारशी पाहणी न करता ते स्टेजवर पोहोचले. भाषणादरम्यान उद्यानाचे उद्घाटन झाल्याचे घोषित करत, त्यांनी मोबाईल कॅमेरावाल्यांचा समाचार घेतला. येत्या काही दिवसांत अचानक उद्यानाला भेट देऊन, नक्कीच पाहणी करेन आणि झाल्यास सूचना ही करेन, हे सांगायला राज ठाकरे विसरले नाहीत.