Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Pune › वन विभाग पक्ष्यांसाठी उभारणार कृत्रिम घरटी

वन विभाग पक्ष्यांसाठी उभारणार कृत्रिम घरटी

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 10 2018 12:09AMपुणे : सुनील जगताप

झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे. बैठी घरे जाऊन उंचच्या उंच इमारती उभ्या राहात आहेत. वळचणीच्या जागा कमी झाल्या आहेत. स्थानिक झाडे ज्यांच्यावर पक्ष्यी घरटी करतात, त्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या अन्न व निवाराचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वन विभागाच्या वतीने पक्ष्यांच्या निवार्‍यासाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा उपक्रम शहरामध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रथम राबविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत अनेक कारणांमुळे पक्ष्यांच्या अधिवासांवर संक्रांत आलेली आहे. अन्न आणि निवारा याच पक्ष्यांच्या दोन मुख्य गरजा आणि त्यातील निवार्‍याचाच प्रश्न भेडसावू लागल्याने पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांची घटती संख्या पर्यावरण अन्न साखळीस बाधक आहे. पुणे शहराव्यतिरिक्‍त इतर ठिकाणी पक्ष्यांच्या निवासाची फारशी अडचण निर्माण होत नाही. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पक्ष्यांनी झाडांवर घरटी तयार केलेली आहेत. तर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमींनीही कृत्रिम घरटी तयार करुन पक्ष्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. परंतु, या उलट शहरामध्ये मात्र पक्ष्यांची निवार्‍याची गैरसोय होत असून वाढत्या उन्हामुळे तीव्र पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. 

काही ठिकाणी टँकरच्या फेर्‍यांना आता सुरुवात झाली आहे. उन्हाच्या कडाक्याचा फटका मानवांबरोबरच आता पक्ष्यांनाही बसत आहे. जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी पर्यावरणप्रेमींनी कृत्रिम घरटी तयार करुन पक्ष्यांना राहण्याची सोय केलेली आहे. काही ठिकाणी तर त्यांच्या पाण्याची आणि खाण्याचीही सोय केल्याचे दिसून येते. शहरपातळीवर मात्र पक्ष्यांची फरफट होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे घरटी करण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यांच्या निवासाची गैरसोय होऊ लागली आहे. वन विभागाच्या वतीने ही पक्षाच्या कृत्रिम घरट्यांसाठी मार्च महिन्यामध्ये तीन लाख रुपयांची विशेष तरतूद  केलेली आहे. त्याद‍ृष्टीने शहर पातळीवर प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम घरट्यांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1 हजार कृत्रिम घरटी तयार करण्यात येणार असून ती भांबुर्डा येथील वन विभागाच्या वनांमध्ये लावण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये शहरातील इतर वनविभागांच्या जंगलामध्ये तसेच तळजाई, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी आदी टेकड्यांवरही ही कृत्रिम घरटी ठेवण्यात येणार आहे. याबाबत वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, वन विभागाच्या वतीने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भांबुर्डा येथे प्रायोगिक तत्त्वावर 1 हजार घरटी बसविण्यात येणार आहे. 

हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी काळात इतर टेकड्यांवर तसेच वन विभागाच्या जंगलांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याची आवश्यकता भासलेली नाही. प्रत्येक गावातील काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन 25 घरटी तर काहींनी 50 कृत्रिम घरटी पक्ष्यांसाठी निर्माण केलेली आहेत. 
 

Tags : pune, pune news, Forest Department, birds artificial nests,