Mon, Aug 19, 2019 09:36होमपेज › Pune › परदेशी वेश्यांनी घेतला ‘लेडी सिंघम’चा धसका

परदेशी वेश्यांनी घेतला ‘लेडी सिंघम’चा धसका

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:32AMपुणे : देवेंद्र जैन

शहरात राजरोसपणे वेश्या व्यवसाय करणार्‍या परदेशी महिलांवर शहरातील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंग यांनी लगाम लावला असून, सद्यःस्थितीत वेश्या व्यवसाय करणार्‍या अशा अनेक परदेशी महिलांनी ‘लेडी सिंघम’ ज्योती प्रिया सिंग यांचा धसका घेतल्याचे दिसून येते आहे. चालू वर्षात 10 महिलांची सुटका करून संबंधित देशाच्या वकिलातींना कळवून या सर्व महिलांना काळ्या यादीत टाकले आहे. 

ज्योती प्रिया सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत ज्या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे, तेथील नागरिक आजही त्यांची आठवण  काढतात. त्यामुळे त्यांची ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पुणे येथे त्या परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाच्या उपायुक्त आहेत. पुणे शहरात फोफावत असलेल्या वेश्या व्यवसाय करणार्‍या परदेशी महिलांबाबत बोलताना सिंग म्हणाल्या की, माझ्या कार्यालयात शहरात येणार्‍या प्रत्येक परदेशी नागरिकांनी नोदणी करणे आवश्यक आहे.

ज्या वेळी पोलिस परदेशी नागरिकांना पकडतात, त्यावेळी त्यांची संपूर्ण पडताळणी होते. जर त्या व्यक्तीने परकीय नागरी कायद्याचे उल्लंघन केले असल्यास, संबंधित देशाच्या वकिलातीला कळवण्यात येते. तोपर्यंत त्या व्यक्तीला आमच्या निगराणीमध्ये, अथवा सरकारी महिला मदत केंद्र येथे पाठवण्यात येते. यामध्ये पोलिसांची खूप दमछाक होते, पण परकीय नागरी कायद्याचे पूर्ण पालन करून संबंधित देशाच्या वकिलातीने कळवल्यानंतर त्या व्यक्तीची रवानगी त्यांच्या देशात केली जाते, असे सिंग म्हणाल्या. 

सिंग यांच्या म्हणण्यानुसार, 2017 अखेर पोलिसांनी थायलंड, रशिया, उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान येथील 21 महिलांना या व्यवसायातून सोडवले आहे. तसेच 2018 मध्ये आतापर्यंत 10 महिलांची सुटका करण्यात आली असून  संबंधित देशाच्या वकिलातींना कळवून या सर्व महिलांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यातील एक उझबेकिस्तानची नागरिक असलेली महिला 23 जानेवारी 2018 रोजी वेश्या व्यवसाय करताना पुणे येथे पकडली गेली होती.

तिच्या विरोधात येरवडा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती महिला 3 ऑगस्ट 2016 रोजी उझबेकिस्तानातून पर्यटक व्हिसावर काठमांडू (नेपाळ) येथे पोचली. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तिने बेकायदेशिरपणे भारतात प्रवेश केला. भारतात ती अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय करत होती. नंतर ती पुणे शहरात आली. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये ती सापडली. सध्या तिला हडपसर येथील महिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले आहे.