Wed, Mar 20, 2019 08:52होमपेज › Pune › संपत्तीसाठी जन्मदात्रीला केले बेघर

संपत्तीसाठी जन्मदात्रीला केले बेघर

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMपुणे : अक्षय फाटक

मुंबई महापालिकेत पती मोठ्या पदावर...दोन मुले अन् एक मुलगी...तिघांचीही लग्न झालेली... सुखी आणि संपन्न असं घर...पण दुर्देवाने पतीचे अचानक निधन झाले आणि पत्नीची परवड सुरू झाली.  हयात असताना पतीने पत्नी आणि मुलींचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होऊ शकेल ऐवढी  संपत्ती जमवून ठेवली होती. परंतु वडिलाच्या निधनानंतर आपल्या  82 वर्षीय वृद्ध आईचा सांभाळ करण्याऐवजी या उच्चशिक्षीत मुलीने केवळ संपत्त्तीसाठी जन्मदात्रीला बेघर केल्याची घटना समोर आली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध मातेने न्यायासाठी पुणे पोलिसांकडे धाव घेतली आहे.

पुण्यातील मध्यवस्थीत राहणार्‍या 82 वर्षीय ज्येष्ठ महिलेची ही दुर्देेवी कहाणी आहे. त्यांचे पती मुंबई महापालिकेत उपायुक्‍त होते. ते मुळचे मुंबईचे आहेत. पण, पती नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले.  पतीला अभिनयाचाही आवड होती.  त्यांनी नाटकात अभिनय केला असून एक-दोन नव्हे तर, त्यांची दहा ते बारा नाटकेही गाजली. 
पत्नी गृहिणी. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले. एकुलती एक मुलगी म्हणून ती वडिलांच्या  लाडाची. त्यामुळे तिला वडिलांच्या सर्व व्यवहारांची माहिती होती. वडिलही विश्‍वासान दागिने, ठाणे परिसरातील फ्लॅट तसेच बँकेतील ठेवी तसेच इतर माहिती तिला सांगत.

उच्च शिक्षित असलेल्या मुलीचा प्रेम विवाह.  विवाहानंतर ती मुंबईत स्थायिक झाली. तर, एका मुलाचे निधन झाले आणि दुसर्‍या मुलाचा घटस्फोट झाला. पण, तो काहीच काम धंदा करत नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला. त्यामुळे पतीच्या निधनानंतर 82 वर्षांच्या मातेवर पोटच्या मुलाची आणि दोन नातवडांची जबाबदारी येऊन पडली. 

परंतु पतीचे निधन झाल्यानंतर पोटच्या मुलीनेच गैरफायदा घेण्यास सुरूवात केली.  एकेदिवशी आईला गोड बोलून मुंबईला नेले. वय झाल्याने काही दिवसांनी तुला आता वेगवेगळ्या बँकेत  फिरणे होणार असे सांगत तीन ते चार बँकेतील ठेवी, सोने काढले आणि एकाच बँकेत  ठेवल्या. परंतु त्या आईच्या ऐवजी स्वत:च्या नावावर ठेवल्या आणि आईला सेेंकड होल्डर केले. तर, घरांची कागदपत्रेही तिने स्वत:कडे घेतली. आईच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. आईला काही दिवस चांगले सांभाळले. तर, ठाणे परिसरात असणारा फ्लॅट आईच्या परस्पर तिने मैत्रिणीला विकला. त्याचे पैसे स्वत: घेतले. काही दिवसांनी आईने तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी तिने आता तुझे सर्व पैसे, दागिने संपले आहेत. मुलावर सर्व खर्च केल्याचे सांगत तिला टाळले. हा सर्व प्रकार आईच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत तिच्याकडे विचारपूस केली. पण, तिने काही दाद लागू दिली नाही. तर, ठाण्यात असणारा फ्लॅटही विकला. आईला समजताच तिने या पैशांबाबत विचारले.  मात्र, तिने त्यातील  एकही दमडी आईला दिली नाही. 

मुलगीच दाद लागू देईना आणि दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नाही, त्यामुळे त्यांनी  पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली. पण, ती काही थांगपतत्त्ता लागू देईना. मग, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच  एके दिवशी ठाण्यात हजर झाली.  पण, त्यावेळी तिने  मला खूप कामे असतात.  हे आमच घरच मॅटर आहे. तुम्ही यात लक्ष घालू नका, अशी भाषा  पोलिसांना वापरण्यास सुरुवात केली. पण, पोलिसांनी तिला समजावून सांगत आईचा सांभाळ करावा लागेल, असे सांगितले. तिने वेळ मारून नेण्यासाठी आईला सांभाळेन, असे म्हणून काढता पाय घेतला. पोलिसांनी सांगितल्यानुसार तिची आईला मुंबईला गेली. परंतु, तिने आईला तेथून हाकलून दिले.  
काम धंदा न करणार्‍या पोटच्या मुलगा आणि दोन नातवडांची जबाबदारी उतारवयात आईवर आली आहे. तिचे जगणही आता असाह्य झालं आहे.   पुणे पोलिसांकडून न्याय मिळेल अशी तिला आशा आहे.