Fri, Nov 16, 2018 17:06



होमपेज › Pune › दोन वर्षे आदर्श गावांना पुरस्कार बंदी

दोन वर्षे आदर्श गावांना पुरस्कार बंदी

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:31AM



पुणे : प्रतिनिधी

शासनाच्या वतीने राज्यातील गावांचा शाश्‍वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 2016 पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, आदर्श ठरलेल्या गावांकडून जुनीच विकासकामे दाखवून वारंवार पारितोषिक स्वीकारले जात आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कारप्राप्त गावांना पुढील दोन वर्षांसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गत पुरस्कारासाठी विचारात न घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हास्तरावर निवड झालेल्या गावांची निवड तालुकास्तरावर करण्यात येत होती. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम घोषित केलेल्या ग्रामपंचायतीला त्याच विकासाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात येत होते. दरम्यान शासनाच्या विविध पुरस्कार योजनांतर्गत गावांकडून पुन्हा तीच विकासकामे दाखवून पारितोषिक मिळविले जात होते. त्यामुळे इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नव्हती. दरम्यान जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना संबंधित विकासकामांच्या आधारे वारंवार पारितोषिक न देण्याबाबत शासनाने भूमिका घेतली होती. 

दरम्यान शासन निर्णयानुसार स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनांतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे आणि तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्मार्ट ग्राम योजनांतर्गंत पुरस्कारासाठी विचारात न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावांकडून जुनीच कामे दाखवून वारंवार पारितोषिक मिळविण्याचा प्रकार बंद करण्याच्या निर्णयामुळे इतर गावांना फायदा होणार आहे. आदर्श ग्राम योजनेची जुनी कामे दाखविण्याच्या प्रकारामुळे इतर विकास झालेली गावे दृष्टीआड गेली होती. त्यामुळे जुनीच कामे दाखवून पारितोषिक लाटणार्‍या गावांना शासननिर्णयामुळे चाप बसणार आहे.