Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › जगद‍्गुरूंची पालखी वरवंडला विसावली

जगद‍्गुरूंची पालखी वरवंडला विसावली

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:46PMकेडगाव : विजय चव्हाण

यवत येथील भैरवनाथ मंदिरातून बुधवारी (दि. 11) सकाळी प्रस्थान झालेल्या जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वरवंड गावात दुसर्‍या मुक्‍कामासाठी सायंकाळच्या सुमारास आगमन झाले. यावेळी पालखीचे स्वागत वरवंड गावचे सरपंच संतोष कचरे, उपसरपंच प्रतापराव फरगडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाचपुते यांच्यासह तुषार दिवेकर, मनोज सातपुते, नाना शेळके, दिलीप दिवेकर, विजय दिवेकर आणि नागरिकांसह महिलांनी केले.

यवतमधून प्रस्थान झाल्यानंतर पालखीचे दुपारी भांडगावात आगमन झाले. तेथे गावकर्‍यांनी जमा केलेल्या 100 किलो बेसनाचे पिठले, 150 किलोचा भात आणि 3 हजार भाकरी वैष्णवांसाठी दिल्या. पालखी दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आली होती. यावेळी गावातील पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, रवींद्र दोरगे, सरपंच कमल टेळे, त्यांचे सभासद, ग्रामसेवक प्रकाश जाधव, तलाठी रमेश कदम हे सर्व व्यवस्थेवर लक्ष देऊन होते. यावेळी वैष्णवांची मंदियाळी पुणे-सोलापूर महामार्गाने काही ठिकाणी विसावली होती, तर काही वैष्णव मार्गक्रमण करीत होते. भांडगाव येथे पालखीच्या दर्शनासाठी भांडगाव ग्रामस्थ, खोर आदी भागांतील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने  भांडगाव गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. दुपारी 1 वाजता पालखीने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केले आणि हरिनामाचा  जल्लोष झाला.
हळूहळू पालखी पुढे येत असताना दरवर्षीप्रमाणे चौफुला येथे  4.30 च्या दरम्यान विसावा घेतला. गावाच्या सरपंच प्रणीत सोडनवर, गावचे आधारस्तंभ आनंद थोरात, उपसरपंच सोमनाथ गडदे, सदस्य विलास कोळपे, काकासाहेब पतसंस्थेचे वामन जाधव, त्यांच्या संस्थेचे सर्व कर्मचारी, पंचायत समिती सदस्य माजी सभापती मीनाताई धायगुडे, बी. डी. सोडनवर, ग्रामसेवक संजय डोळस, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, सदस्य विलास कोळपे, जयदीप सोडनवर, त्रिंबकराव सोडनवर, सदस्या सुनंदा भोसले, धायगुडे भाऊसाहेब, संजूनाना धायगुडे, ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ नेवसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

दोन तास पालखी सोहळा विसावला असताना दर्शनासाठी केडगाव, बोरीपार्धी, नानगाव, पारगाव, देलवडी, खोपोडी, दापोडी, गलांडवाडी, शिरूर तालुक्यातील नागरगाव, न्हावरे, रांजणगाव या परिसरातील वाड्या-वस्तीवरील नागरिकांनी गर्दी केली होती.त्यानंतर बोरीपार्धी सीमारेषेवर वरवंडच्या सरहद्दीत पालखी सोहळ्याचे आगमन होताच वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले. 

सायंकाळी 6.30 वाजता पालखी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्‍कामासाठी विसावली. यावेळी आरती घेण्यात आली. मोठ्या संख्येने भाविक आणि वैष्णव सहभागी झाले होते. बारामती येथील तहसीलदार हनुमंत पाटील पालखीच्या भेटीसाठी आले होते. 

पालखी दर्शनासाठी हातवळण, कडेठाण, पडवी, माळवाडी, कुसेगाव, देऊळगाव सुपा, शिरूर तालुक्यातील मांडवगण, सदलागाव, वडगाव या ठिकाणावरून भाविक आले होते. 

बालकाने केली तुकोबांची वेशभूषा 
भांडगाव या ठिकाणी भुलेश्वर डेअरीच्या उताराजवळ पुणे येथील आर. के. डान्स अ‍ॅकॅडमीच्या 11 वर्र्षे वयाच्या डांगरे या बालकाने तुकोबांची वेशभूषा केली होती. ट्रॅक्टरवर बसून तो अभंग गात होता. त्यामुळे त्याच्याकडे लोक आकर्षित होताना दिसत होते.