Fri, Jul 19, 2019 05:46होमपेज › Pune › ‘पूरक’च्या नावासाठी किरकोळची ‘घुसखोरी’ व्यापार्‍यांची सहकारमंत्र्यांकडे धाव

‘पूरक’च्या नावासाठी किरकोळची ‘घुसखोरी’ व्यापार्‍यांची सहकारमंत्र्यांकडे धाव

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये घाऊक बाजाराबरोबरच पूरक व्यवसायाचे परवाने देण्यात यावेत, अशी मागणी व्यापार्‍यांनी सहकारमंत्र्यांना केली आहे. परंतु, या मागणीवर बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्‍वासन दिले गेले असले तरी घाऊक बाजारात पूरक व्यवसायाच्या नावाखाली पुन्हा किरकोळ विक्री सुरू होण्याची शक्यता बाजार आवारात चर्चिली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या नियमानुसार बाजार समितीच्या आवारात घाऊक बाजार करण्यास परवानगी देण्यात आली असून, किरकोळ विक्री सुरू असल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत शासनाच्या आदेशामध्ये देण्यात आलेले आहेत. 

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या बाजार आवारात सुरू असलेली किरकोळ विक्री प्रशासकीय मंडळाने बंद केली असून, त्यामुळे अनेक व्यापारी आणि काही कपंन्यांनी सहकारमंत्र्यांनाच गळ घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मार्केटयार्ड येथील एका खासगी कार्यक्रमाला सहकारमंत्री सुभाष देशुमख आले असताना त्याठिकाणी दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांनी पूरक व्यवसायासाठी बाजार समितीमार्फत परवाने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केलेली आहे. 

या केलेल्या मागणीवर सहकारमंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु, अशा प्रकारे पुरक व्यवसायाला शासनाने परवानगी दिल्यास किरकोळ विक्रीचा पुन्हा घाट घातला जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता पुरक व्यवसाय कोणते याबाबत शासनाकडेच अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्या वस्तुला पुरक व्यवसाय म्हणावे याबाबत शासनाला प्रथम यादी प्रसिध्द करावी लागणार आहे.

याबाबत बोलताना दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले की, घाऊक बाजारामध्ये असलेल्या वस्तू विक्रीबरोबरच इतर पुरक व्यवसायाचे परवाने व्यापार्‍यांना मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी अशा प्रकारचे परवाने बाजार समितीच्या वतीने दिले जात होते. परंतु, सध्या हे परवाने बंद करण्यात आलेले आहेत. याच परवान्याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भेटून मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्‍वासन दिले आहे.

आदेशाशिवाय परवाने नाही

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले की, पुरक व्यवसायाचे परवाने मिळण्याबाबत चेंबरने सहकारमंत्र्यांशी चर्चा केली आहे. वास्तविक पाहता पूर्वी हे परवाने दिले जात असले तरी सध्या ते बंद आहेत. हे परवाने देण्यावरूनही पुन्हा तक्रारी सुरू होतात. जो पर्यंत सहकारमंत्री अथवा शासनाचे काही आदेश मिळत नाही तोपर्यंत तरी बाजार समितीला अशा प्रकारचे परवाने देता येणार नाहीत.