Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Pune › पहिल्या मुक्‍कामासाठी आजोळघरी लगबग

पहिल्या मुक्‍कामासाठी आजोळघरी लगबग

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:40AMआळंदी : वार्ताहर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 6) दिमाखात प्रस्थान होणार असून, या प्रस्थानानंतरचा पहिला मुक्‍काम असलेल्या आजोळघरी माउलींच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. 

देवस्थानच्या वतीने आजोळघराच्या जागी असलेला जुना वाडा ज्याला गांधीवाडा असे म्हणत, तो पाडून त्या जागी प्रशस्त असा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याच दर्शबारीचा दर्शनी भाग मुक्‍कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, या प्रशस्त जागेत वाड्यातील जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे छोटे मंदिर उभारले आहे. या मंदिरासमोरच पालखी मुक्कामासाठी ठेवली जाणार आहे. भक्तांचे योग्य नियोजन होऊन सर्वांना पालखीचे दर्शन घेता येईल, अशी सोय देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. पावसाचा त्रास मुक्‍कामाच्या ठिकाणी होऊ नये, याकरिता लोखंडी पत्रे वापरून आजोळ घरासमोर प्रशस्त मंडप उभारला आहे. आजोळघराच्या चारही बाजूंनी प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंडप सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे. पोलिसांच्या वतीने देखील मुक्‍कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्‍तांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.

पालखी प्रस्थानानंतर आजोळघरी मुक्‍कामाला राहते ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून, हे आजोळ घर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांचे आजोळ आहे. पूर्वी माउली वारीला निघत तेव्हा पहिला मुक्‍काम आपल्या आजोळी श्रीयुत गांधी यांच्याकडे करीत म्हणून तीच प्रथा पुढे पालखी सोहळ्यात रुजू झाल्याचे भक्त सांगत असतात. कालांतराने येथील जुना मातीचा दगडी वाडा ज्याची ओळख गांधीवाडा अशी होती, तो दर्शनबारी व इतर कारणांसाठी पाडावा लागला. तरीही येथील रूढ झालेली मुक्‍कामाची परंपरा विनाखंड सुरू आहे. 

आजही भक्तांची ओढ पालखी प्रस्थान झाल्यानंतर माउलींच्या दर्शनासाठी आजोळघराकडे लागलेली असते. यंदाही पालखी प्रस्थान झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा घालून आजोळघरी स्थिरावेल. त्यानंतर समाज आरती होऊन दिंड्याही आपापल्या मुक्‍कामाच्या ठिकाणी जातील. भक्तांना दर्शन खुले केल्यानंतर जागर होऊन पहाटे माउली पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवतील आणि आजोळघर पुन्हा माउलींचा वर्षभराचा दुरावा घेऊन रिकामे  होईल.