Sun, Aug 18, 2019 14:27होमपेज › Pune › पक्षवाढीसाठी भारिपच्या ‘पँथर्स’ची झेप

पक्षवाढीसाठी भारिपच्या ‘पँथर्स’ची झेप

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:34AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे वलय सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये वाढत आहे. भारिप बहुजन महासंघाकडे नवीन लोकांचा ओढा वाढत आहे. लोकांचा वाढता ओघ पाहता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षबांधणीला महत्त्व दिले आहे. राज्यासह पिंपरी-चिंचवडमधील पक्षाची कार्यकारिणी नव्याने निवडण्याचे त्यांनी संकेत दिले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन शहराध्यक्षांची चाचपणी सुरू आहे. यासाठी सध्याचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, गुलाब पान पाटील, माजी नगरसेवक अंकुश कानडी, संतोष जोगदंड आदींची नावे चर्चेत आहेत. पक्ष बांधणीसाठी भारिपच्या ‘पँथर्स’नेही झेप घेतली असून नवीन लोकांचा पक्षामध्ये प्रवेश घडवून आणला जात आहे. 

मराठा मोर्चावेळी दलितांनी प्रतिमोर्चे काढू नये असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले होते. त्यांच्या या भुमिकेचे मराठा समाजाच्यावतीनेही स्वागत करण्यात आले. तेव्हापासून अ‍ॅड. आंबेडकर व समविचारी मराठा समाजातील कार्यकर्ते व नेते हातात हात घालून पुढे जात आहेत. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांचे नेतृत्व दलितांसह इतर समाज मान्य करत आहेत. पक्षाकडे लोकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आंबेडकरांनीही राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग करत पक्षबांधणीला महत्त्व दिले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या सध्याच्या कार्यकारिणीवर अ‍ॅड. आंबेडकर नाराज असल्याचे चित्र होते. पक्षात नवीन कार्यकर्ते न आल्यामुळे व काम न वाढल्यामुळे 2014 पासून अ‍ॅड. आंबेडकरांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. सध्याच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्याचे संकेत अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिले आहेत. शहराध्यक्षपदासाठी सध्या देवेंद्र तायडे, गुलाब पानपाटील, माजी नगरसेवक अंकुश कानडी यांची नावे चर्चेत आहेत. देवेंद्र तायडे यांच्या कार्यकाळात पक्षाचे अस्तित्व शहरात अबाधित राहिले. नवीन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जोडले गेले नसले तरी आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी शहरात पक्ष जिवंत ठेवला हेही नाकरता येत नाही. पक्षातील काही कार्यकर्ते व पदाधिकारी खासगीत तक्रार करत आहेत. प्रत्येक पक्षात अशी ओरड असतेच. 

माजी नगरसेवक अंकुश कानडी यांचेही नाव चर्चेत असले तरी मधल्या काळात त्यांचे काम थंडावले होते. त्यामुळे त्यांच्यासह सध्या तरूण म्हणून गुलाब पानपाटील यांचे नावही शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. संतोष जोगदंड यांनीही सम्यक विद्यार्थी आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळले आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य...

सध्या लोकांच्या भारिपला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे जुन्यांसह नवीन तरुण कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. सर्व जातीधर्मातील लोकांना पक्षाकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘ओबीसी’, ‘एस. सी.’ व इतर वंचित घटकांना पक्षासोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घडवून आणला जात आहे. सध्या पक्षातील कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.