होमपेज › Pune › बालगंधर्व, पठ्ठे बापूराव महाराष्ट्राला पडलेली स्वप्नं

बालगंधर्व, पठ्ठे बापूराव महाराष्ट्राला पडलेली स्वप्नं

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:45AMपिंपरी : प्रतिनिधी

लोककला ही मातीतली कला असल्याने ती लोकांना आवडते. क्षणभर मनाला रुंजी घालणारे ताल लोककलेतूनच मिळतो. पिंपरी चिंचवड शहरातही अनेक लोककला जपल्या जात असूून, दिवसेंदिवस या शहरात सांस्कृतिक वैभव वाढतेच आहे. लोककलेला जीवंत ठेवण्याचे काम आजवर अनेक लोककलाकारांनी केले असून, बालगंधर्व व पठ्ठे बापूराव ही महाराष्ट्राला पडलेली दोन स्वप्ने आहेत, असे मत सिक्कीम राज्याचे राज्यपाल व लोककला संमेलनाचे उद्घाटक श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परीषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.13) व शनिवारी (दि.14) दोन दिवसीय अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून श्रीनिवास पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आ. लक्ष्मण जगताप, संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे तसेच स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, रजनीदेवी श्रीनिवास पाटील, प्रकाश खांडगे आदी उपस्थित होते. 

श्रीनिवास पाटील म्हणाले की, जी आतून येते ती लोककला. तसेच ज्या कलेतून अंधार नाहीसा होतो व दिव्य प्रकाश पडतो ती खरी लोककला असते. आण्णासाहेब मगर यांनी साधी माणसे सोबत घेउन ही औद्योगिकनगरी उभी केली. प्रत्येक क्षेत्रात शहराचा विकास होत असून, सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी- चिंचवडचा झेंडा सतत वरवरच जायला हवा; तसेच या ठिकाणी लोककला टिकवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करायला हवेत. यासाठी लागेल ती मदत करण्यास सदैव तत्पर असल्याचे श्रीनिवास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या खास मराठमोळ्या शैलीत लोककलांचे महत्व सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी हे लोककला संमेलन आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी लोककलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

प्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुतण्याने हा पुरस्कार स्विकारला. यावेळी वसंत अवसरीकर यांना सोंगाड्या, संजीवनी मुळे- नगरकर यांना लोकनाट्य, पुरुषोत्तम पाटील यांना कीर्तन, बापूराव भोसले(गोंधळी) मुरलीधर  सुपेकर यांना शाहीरीसाठी सोपान खुडे यांना साहित्यगौरव व प्रतिक लोखंडे याला युवाशाहीर  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लोककलाकार प्रेक्षागृहात उपस्थित होते. त्यामुळे प्रेक्षागृहात सांस्कृतिक वातावरण तयार झाले होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले.

जिल्ह्यानिहाय लोककला अकादमी स्थापन व्हावी : डॉ. देखणे

अभिजात रंगभूमीचा जन्मच लोककलेतून झाला असून लोककलाकारांना अभिजात कलाकारांप्रमाणे स्थान मिळाले पाहीजे, तसेच सर्व लोककला निरुपण प्राधान्य असून लोककलेच दालन व्हावे. आपण लोककलांपासून तुटत चाललो असून लोककलांचे विद्यापिठ व्हावे असे मत समेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. तसेच लोककला म्हणजे लोकरंजनातून प्रबोधन घडवणारे एक स्वतंत्र विद्यापिठ आहे. या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे या भाषेत डॉ. देखण़े यांनी लोककलांचे महत्व उपस्थितांना आपल्या खास शैलीत विशद केले. यावेळी त्यांनी पठ्ठे बापूरावाच्या आठवणींना उजाळा दिला.