Tue, Jul 16, 2019 00:04होमपेज › Pune › नववी नापासांसाठी होणार फेरपरीक्षा

नववी नापासांसाठी होणार फेरपरीक्षा

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांनी जून 2018 अखेर फेरपरीक्षा घेऊन त्यांना आणखी एक संधी देण्याचे परिपत्रक माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी काढले आहे. यामुळे इयत्ता नववीमध्ये मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जावी, याबाबतचे परिपत्रक माध्यमिकच्या शिक्षण संचालकांनी काढले आहे. सर्व विभागीय उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना या आदेशाची प्रत देण्यात आली असून, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व माध्यमिक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच ही फेरपरीक्षा देता येईल. फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती इयत्ता नववीमध्ये असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील. 

विद्यार्थ्यांना दिलासा...

शिक्षण हक्‍क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागावा, या हेतूने नववीत अनुत्तीर्ण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता शिक्षणसंस्थांना नववीत अनुत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Tags : pune, pune news, class IX, students, test again,