Sat, Jul 20, 2019 13:05होमपेज › Pune › पालखी सोहळ्यासाठी निवडूंग विठोबा आणि पालखी विठोबा मंदीर सज्ज

पालखी सोहळ्यासाठी निवडूंग विठोबा आणि पालखी विठोबा मंदीर सज्ज

Published On: Jul 06 2018 1:45AM | Last Updated: Jul 06 2018 1:36AMपुणे : प्रतिनिधी

पांडूरंग हरी, वासुदेव हरी विठ्ठल, विठ्ठल.., जय जय रामकृष्ण हरी..., काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल..., माझे माहेर पंढरी..., यांसारखे अभंग, भक्तीगीते गात वारकरी पंढरपूरच्या वारीला सुरुवात करणार आहेत. येत्या दोन दिवसांनी पालखी पुणे मुक्कामी असणार आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर नाना पेठ येथील निवडूंग विठोबा आणि भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर सज्ज झाले आहे.

येत्या 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.पंढरपूरला जाण्यापूर्वी दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो. त्यासाठी नाना पेठ येथील निवडूंग विठोबा मंदिर व भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर सज्ज झाले आहेत. त्यामुळे भाविकांची आणि वारकर्‍यांची या परिसरात प्रचंड गर्दी होणार आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरात पत्र्याचे शेड असलेले मंडप उभारण्यात आले आहेत.

नाना पेठ येथील निवडूंगा विठोबा मंदिरात पालखी सोहळ्यासाठी मंदिरातील सर्व चांदीच्या कमानी तसेच चांदीचे खांब पॉलिश करण्यात आलेल्या आहेत. तसेच परिसरात उभारलेल्या पत्र्याच्या शेडला आतील बाजूने रंगीत कापड व झालर लावण्यात आली आहे. तसेच मंदिरात व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर भवानी पेठ येथेही मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. नाना पेठ मंदिर, भवानी पेठ मंदिर परिसरात पालखी सोहळ्यादरम्यान काही अनपेक्षित घडू नये, यासाठी सीसीटिव्हीसह बसविण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आणि सीसीटिव्ही कंट्रोल रूम देखील सज्ज होत आहेत. तर सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त देखील असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यादरम्यान परिसरात होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावताना दिसत आहेत.