Wed, May 22, 2019 23:03होमपेज › Pune › फूल संशोधन केंद्र अडकले निविदेतच

फूल संशोधन केंद्र अडकले निविदेतच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : नरेंद्र साठे

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेमध्ये (एनआयपीएचटी) फूल गुणवत्ता केंद्र हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी  तीन वर्षांपूर्वी मिळाली असून, मागील महिन्यात त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तीन वर्षांत या प्रकल्पासाठी केवळ जमीन सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उशिरा का होईना; पण यामुळे अनेक शेतकर्‍यांना याचा फायदा मिळणार आहे.

इंडो-डच कृती आराखड्यांतर्गत हा प्रकल्प सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया लांबल्याने हरितगृह उभारण्यास विलंब झाला आहे. या प्रकल्पात फुुलांचे उत्पादन गुणवत्तेत वाढ होण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत तीन वर्षांपूर्वी निधी मंजूर केला होता, त्यात काही दिवसांनी वाढही करण्यात आली. परंतुु, निविदा काढूनदेखील याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. परिणामी प्रकल्पाला उशीर झाला असून, सध्या फक्त जमीन सपाटीकरणाचेच काम झाले आहे.

भारत आणि नेदरलँड (डच) या दोन देशांमध्ये सामंजस्य कराराअंतर्गत कृषी आराखडा तयार करण्यात आला. राज्यामध्ये विविध फूल पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र; तसेच नियंत्रित वातावरणामध्ये फूल पिकाखालील वाढणारे क्षेत्र विचारात घेऊन फुलांची उत्पादकता वाढविणे, त्याकरिता प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, नवीन जातीचा अवलंब; तसेच लागवड साहित्यांचा वापर करणे, आदर्श कृषी पद्धतीचा अवलंब करणे, त्याचबरोबर काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, पणन व निर्यात याद्वारे या फुलांचे मूल्यवर्धन या महत्त्वाच्या बाबींचा अवलंब शेतकर्‍यांनी करावा, यासाठी त्यांना या संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

या प्रकल्पाचा आराखडा नेदरलॅँडमधील पम एक्सपर्ट आणि कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी तयार केला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी नेदरलँड सरकारकडील पम एक्सपर्टची तांत्रिक मदत मिळणार आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प केव्हा सुरू होणार यासंदर्भात ठोस उत्तर मिळाले नाही. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


  •