Sun, May 26, 2019 21:32होमपेज › Pune › रायपूर, हैद्राबादसाठी पुण्यातून विमानसेवा

रायपूर, हैद्राबादसाठी पुण्यातून विमानसेवा

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:01AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातून रायपूर आणि हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे, तर सप्टेंबरमध्ये गोव्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. जेट एअरवेज कंपनीकडून रायपूरसाठी आठवड्यातून दोनदा विमानसेवा  सुरू केली जाणार आहे, तर हैद्राबादसाठी स्पाईसजेटची विमानसेवा  दररोज असेल. विमान प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने नव्याने विमानसेवा सुरू करण्यावर भर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोहगाव विमानतळ प्रशासनाने काही नवीन विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पुणे शहर आणखी काही शहरांना विमानसेवेद्वारे थेट जोडले जाणार आहे. मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा  आकडा सुमारे 85 लाखांपुढे गेला आहे. पुढील वर्षभरात सुमारे 1 कोटींच्या पुढे ही संख्या जाईल, असा विमानतळ प्रशासनाचा अंदाज आहे. 

सध्या विमानतळावरून दररोज सुमारे 200 विमानांचे उड्डाण होते. मागील वर्षभरात त्यामध्ये सुमारे 40 विमानांची भर पडली आहे. आयटी हब असलेल्या पुणे शहरामध्ये देशातील विविध शहरांमधून ये-जा करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी नोकरदार, व्यावसायिक, उद्योजकांकडून विमानसेवेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विविध शहरांसाठी ही सेवा सुरू करण्याची मागणी असते.