Fri, Apr 26, 2019 15:40होमपेज › Pune › पौडरोडला फ्लेक्सबाजीचे ग्रहण

पौडरोडला फ्लेक्सबाजीचे ग्रहण

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:11AMपौडरोड : दीपक पाटील

पौडरोड परिसरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागांवर तसेच पौडफटा, मोरे विद्यालय चौक, एमआयटी कॉलेज परिसर, वनाज कॉर्नर, शास्त्रीनगर, कोथरूड डेपो, चांदणी चौक या परिसरात अनधिकृत फ्लेक्सला उधाण आले आहे. या अनधिकृत होर्डिंग्जबाजीमुळे संपूर्ण परिसर विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. परिसर विद्रुपीकरणासह पालिकेची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणार्‍यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

महापालिका हद्दीत फ्लेक्स लावण्यासाठी आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही कुठलीही परवानगी न घेता तसेच अनेक मान्यवर राजकीय नेतेमंडळी, युवा नेतेमंडळी, कोणाचा वाढदिवस, वर्षभरातील विविध सण , अभिनंदन, नियुक्तीचे फ्लेक्स, बांधकाम व्यावसायिक, लहान- मोठे हॉटेल व्यावसायिक आपली जाहिरात करत रस्त्यावर, पदपथावर  फ्लेक्स लावत आहेत. यामुळे परिसरला फ्लेक्सबाजींचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 
अधिकृत फ्लेक्ससाठी लाखोंचे शुक्ल पालिकेला द्यावे लागते. त्याऐवजी राजकीय कार्यकर्त्यांना काही हजार रुपये दिल्यास विनापरवाना फ्लेक्स लावण्याची सोया होते. कार्यकर्ते अशा फ्लेक्सवर कार्यवाही होऊ नये, यासाठी अधिकार्‍यांशी संगनमत करतात.

पथदिव्यांवर ठराविक उंचीवर जाहिरातीचे फ्लेक्स लावल्यास अधिकारी कार्यवाही करत नाहीत, अशी माहिती जाहिरातदार खासगीमध्ये सांगतात. यामुळे या परिसरातील पथदिव्यांवर सर्रास जाहिरती झळकताना दिसत आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

या पथदिव्यांवर खूप उंचीवर फ्लेक्स लावले आहेत. आमच्याकडे गाडी नाही असे कारण सांगून पथदिव्यावरील अनधिकृत फ्लेक्सवर आकाशचिन्ह विभागातील अधिकारी सोयीस्करपणे डोळेझाक करतात. पथदिव्यांवर अनधिकृत फ्लेक्स लावण्यासाठी जाहिरातदारांना कोणतीही अडचण येत नाही. जाहिरातीमधील अर्थकारणामुळे फ्लेक्सवर कार्यवाही होत नाही, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

या फ्लेक्समुळे वाहनचालाकंचे लक्ष विचलीत होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र या फ्लेक्सवर कारवाई करण्यात येत नाही. या परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.