होमपेज › Pune › भटके ‘पॅथॉलॉजिस्ट’ रडारवर

भटके ‘पॅथॉलॉजिस्ट’ रडारवर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:08AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

एकाच वेळी दहा ते पंधरा ठिकाणच्या पॅथॉलॉजी लॅबशी संधान साधून, रोगनिदान अहवालाबाबत कोणतीही खात्री न करता, डिजिटली किंवा लेखी सही करून देणार्‍या पॅथॉलॉजीस्टवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पॅथॉलॉजिस्टने लॅबमध्ये स्वतः हजर राहून, त्याचा अहवाल देणे व नागरिकांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अशा पॅथॉलॉजिस्टची तक्रार ‘महाराष्ट्र मेडिकल काउंसिल’ कडे करावी, असे आवाहन काउंसिलने केले आहे.

लॅबमधील रोगनिदान अहवालांची संपूर्ण माहिती न घेता एकापेक्षा अधिक ठिकाणी सही करणार्‍या एका पॅथॉलॉजिस्टचा वैद्यकिय नोंदणी परवाना, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल (एमएमसी) ने सहा महिन्यांसाठी नुकताच रद्द केला आहे. याच महिन्यात 3  तारखेला एमएमसीने डॉ. प्रवीण शिंदे यांची नोंदणी रद्द केली असून, ते कर्जत, रोहा, पनवेल येथील अनेक लॅबमध्ये त्यांनी सह्या केल्याचे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. याबाबत राज्याच्या पॅथॉलॉजी संघटनेनेच तक्रार केली होती. हाच निर्णय आता राज्यातील सर्वत्र लागू असून, इथून पुढे अशा भटक्या पॅथॉलॉजिस्टवरही कारवाई होणार आहे. 

सध्या पॅथॉलॉजी लॅबचा शहरात बाजार मांडला गेला आहे. बारावीनंतर डीएमएलटी करणार्‍या टेक्निशियन्सनी अशा रोगनिदान प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी लॅब) थाटल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणाचीही परवानगी घेण्याची आवशकता नसते. पुरेसे पॅथॉलॉजिस्ट नसल्याची स्थिती त्यांच्या पथ्यावर पडते. अनेक लॅबचालकांनी एकाच पॅथॉलॉजिस्टला महिन्याला भरमसाठ रक्‍कम देऊन केवळ सह्या करण्यापुरते कामावर ठेवले आहे. यामुळे  हे पॅथॉलॉजिस्ट एकापेक्षा अधिक व जवळपास दहा ते पंधरा ठिकाणच्या लॅबमध्ये रुग्णाच्या रोग निदानाची खात्री न करता, सह्या करून दोघेही रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. काही लॅबचालक तर पॅथॉलॉजिस्टकडे जाउन रिपोर्टवर सह्या आणतात. याला काय म्हणणार! 

तरच द्या रक्‍ताचे नमुने

याबाबत बोलताना ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट’ संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, कोणत्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी रक्‍ताचे नमुने देताना तेथे पॅथॉलॉजिस्ट आहे का, याची खात्री करणे आवशक आहे; कारण अनेक लॅब या कायद्यापासून बचाव करण्यासाठी पॅथॉलॉजिस्टच्या केवळ सहया विकत घेतात. 

शहराबाहेरही थाटली दुकाने

पॅथॉलॉजी क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पॅथॉलॉजिस्टनी केवळ या शहरातच नव्हे तर नाशिक, बारामती येथेही लॅबचालकांना सह्या विकत आहेत. अशा वेळी पुण्यातून खरोखरच हे पॅथॉलॉजिस्ट तेथे जाऊन सर्वकाही नियमानुसार सह्या करत असतील की नाही, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवशकता नाही. त्यामुळे रुग्णांनीच जागे होउन आता त्यांच्याविरुध्द एमएमसीकडे तक्रार करण्याची गरज आहे.

कायदा काय सांगतो

नियमाप्रमाणे पॅथॉलॉजिस्टला एकापेक्षा अधिक लॅबमध्ये अहवालावर सही करता येऊ शकते; पण ते रिपोर्ट त्या पॅथॉलॉजी विषयात एमडी किंवा डिप्लोमा घेतलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या समोर रक्‍ताचे नमुने घेऊन रिपोर्ट तयार केलेले असणे आवशक आहे. नंतर त्या रिपोर्टवर स्वतः हजर राहून सही करणे आवशक आहे. डिजिटल सही करणे हे नियमबाहय आहे. तसेच, रुग्ण रिपोर्ट घेताना त्याला काही शंका असल्यास, त्यावेळी तो पॅथॉलॉजिस्टने स्वतः शंकेचे निरसन करणे आवशक आहे. ही  मार्गदर्शक तत्वे पाळताना एकच पॅथॉलॉजिस्ट दहा ठिकाणी सही करू शकत नाही. म्हणून आता त्यांच्यावर कारवाई होउ शकते.