Thu, Jun 20, 2019 06:45होमपेज › Pune › ‘पीएमआरडीए’साठी लावा पुण्याच्या पाण्याला कात्री

‘पीएमआरडीए’साठी लावा पुण्याच्या पाण्याला कात्री

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

‘पीएमआरडीए’साठी पुणे शहराच्या पाण्याला कात्री लावण्याचा अजब उपाय जलसंपदा विभागाने सुचविला आहे.  शहराला सद्यःस्थितीला होणार्‍या पाणीपुरवठ्यातून 8 टीएमसीची कपात करण्याबरोबरच भामा-आसखेड धरणातून पुणे आणि पिंपरी चिंचवडचे आरक्षण रद्द झाल्यामुळे शिल्लक राहणारे 5 टीमसी आणि कालव्याचे पाणी बोगद्यातून नेऊन त्यातून 2.4 असे तब्बल 15.5 टीएमसी पाणी पीएमआरडीएला देता येईल, असा जावई शोध जलसंपदाने लावला आहे. महापालिका प्रशासनाने मात्र शहराचे पाणी कमी करून पीएमआरडीएला देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे शहराला कायम पाण्यात पाहणार्‍या जलसंपदा विभागाचे उद्योग काही थांबण्यास तयार नाहीत. आठवड्यापूर्वी पुणेकरांच्या पाणी वापरावरून टीका करणार्‍या, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या खात्याने आणखी एक निर्णय घेत आता पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. पीएमआरडीएअंतर्गत येणार्‍या पिरंगुट व सहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 0.5 टीएमसी पाणी लागणार आहे. त्यासाठी टेमघर धरणातून कायमस्वरुपी पाणी आरक्षण ठेवण्यासंबंधीची मागणी पीएमआरडीएने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यावर पीएमआरडीए आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये बैठकही झाली होती. त्यावर  जलसंपदा विभागाने पीएमआरडीएसाठी पुण्याच्या पाण्यावरच संक्रात आणण्याचा निर्णय घेतला आहे.