Sun, Aug 25, 2019 03:51होमपेज › Pune › ‘डीएसकें’च्या आणखी पाच गाड्या जप्त

‘डीएसकें’च्या आणखी पाच गाड्या जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या डीएसकें च्या आणखी पाच कार पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या गाड्या जुन्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) व पत्नी हेमंती कुलकर्णी, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

न्यायालयाने अटकेपासून संरक्षण काढून घेतल्यानंतर डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पहिल्याच दिवशी कोठडीत चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याकडे तपास केला. त्यानंतर ‘डीएसकें’ची पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

दरम्यान पोलिसांनी गेल्या महिन्यात ‘डीएसकें’च्या अलिशान सात गाड्या जप्त केल्या आहेत. त्यात 2 बीएमडब्ल्यू, 2 टोयोटा, 1 ऑडी, 1 पोर्शे गाडी जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची किंमत अंदाजे पाऊणेसहा कोटी असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, बुधवारी आणखी पाच कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात तीन इनोव्हा, एक ईटिव्हास व एक सँट्रो कार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त निलेश मोरे यांनी दिली. सध्या डीएसके दाम्पत्य येरवडा कारागृहात आहेत.


  •