Fri, Jul 19, 2019 18:00होमपेज › Pune › धक्‍कादायक! दिवसाला पाच पुणेकर गायब

धक्‍कादायक! दिवसाला पाच पुणेकर गायब

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:46AMपुणे : अक्षय फाटक

शहरातून दिवसाला पाचजण बेपत्ता होत असून, वर्षभरात तब्बल दोन हजार नागरिक हरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात महिलांचे प्रमाण जास्त असून, वर्षभराच्या कालावधीत जवळपास 966 महिला गायब झाल्याने ‘अर्धे जग’ सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  पोलिस दप्‍तरी असलेल्या नोंदीनुसार घराबाहेर पडलेले 883 पुरुष अद्याप परतलेले नाहीत. वर्षभरात बेपत्ता  नागरिकांची एकूण संख्या साडेचार हजार असून, त्यातील अडीच हजार जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. चिंताजनक म्हणजे, दरवर्षी बेपत्ता होणार्‍यांचा आकडा वाढत असल्याने त्यांचा शोध घेण्याचे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान आहे. 

शिक्षणाचे माहेरघर, आयटी शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीकडे सुरू झाली आहे. पूर्वी फक्त पेठांपुरते वसलेल्या पुण्याचा आकार चोहोबाजूंनी अवाढव्य वाढत चालला आहे. नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यात येणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशिक्षितांंच्या हाताला काम मिळू लागल्याने राज्याच्या कानाकोपर्‍याबरोबरच  परराज्यातूनही अनेक लोक महानगरात आलेले आहेत.  मिळेल ते काम करण्याची तयारी असल्याने येथे प्रत्येकाला कामही मिळते. अनेकांनी येथे येऊन छोटे-मोठे व्यवसायही थाटले. त्यामुळे काही वषार्र्ंतच पुण्याची लोकसंख्या जवळपास साठ लाखांच्या घरात गेली. मात्र, बाहेरून येऊन पुण्यात वास्तव्य करणार्‍यांची कोठेही नोंद नाही.

त्यामुळे त्यांची नेमकी संख्याही पुढे येत नाही. एखादी घटना किंवा बेपत्ता झाल्यानंतरच पोलिसांकडे नोंद होते आणि त्यानंतर त्याची माहिती समोर येते. त्यातच शहरातून दररोज  पाच पुणेकर बेपत्ता होत असल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. त्यातही महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात शहरातून तब्बल 4 हजार 437 लोक बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे, तर त्यातील 2 हजार 588 नागरिकांना सुरक्षित परत आणण्यात यश आले आहे.  1 हजार 849 नागरिकांचा अद्यापही  ठावठिकाणा लागलेला नाही. यात घरातून कामावर गेला, परंतु घरी परतला नाही; घराघुती वादातून निघून गेला; तर अनेक जण नैराश्यातून घर सोडतात.

तसेच कर्जबाजारीपणा, डोक्यावर परिणाम झाल्यामुळेही घर सोडून जात असल्याचे समोर आले आहे. बेपत्ता होण्यामधील प्रमुख कारण प्रेम प्रकरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैतिक संबंधांतूनही पळून गेल्याच्या काही घटना असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अनेकांकडून बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते; मात्र, ते मिळून आल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली जात नाही, असे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक, मित्र तसेच कामाच्या ठिकाणी शोध घेतला जातो. मिळून न आल्यास पोलिसांकडे धाव घेतली जाते. पोलिसांकडून शहरातील इतर पोलिस ठाणी, लोहमार्ग पोलिस व इतर यंत्रणांना कळविले जाते. त्यानुसार पोलिसांकडून शोध घेतला जातो.