Fri, Aug 23, 2019 23:48



होमपेज › Pune › फिटनेस ट्रॅकच्या फिटनेसमध्ये ‘गोलमाल’

फिटनेस ट्रॅकच्या फिटनेसमध्ये ‘गोलमाल’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : नवनाथ शिंदे

सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन ट्रॅक उभारणीच्या कामाकडे काणाडोळा केल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत ट्रॅकवर खड्डे पडले आहेत. तर, डांबरीकरणाचे अस्तरीकरण आणि पिचिंगचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे ट्रॅकवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाला आहे. तसेच निविदाप्रमाणे डांबरीकरणाचा थर आहे की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. साईड पट्ट्यांचे रोलिंग न झाल्यामुळे ट्रॅकवरून वेगाने जाणारे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फिटनेस ट्रॅक आहे की अपघातांसाठी रचलेला सापळा, अशी विचारणा वाहन मालकांनी केली आहे.

झेंडेवाडी परिसरात ठेकेदाराकडून उभारण्यात आलेल्या 250 मीटर वाहन टेस्ट ट्रॅक आरटीओला हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर 20 नोव्हेंबरपासून ट्रॅकवर वाहनांची फिटनेस तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, काम व्यवस्थित न झाल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत ट्रॅकचा बोजवारा उडाला आहे. तर, सुमारे वर्षभरापासून वर्कऑर्डर मिळाली असतानाही अवघ्या एक ते दोन महिन्यांत काम पूर्ण केल्यामुळे कामाचा दर्जा खालावला असल्याची चर्चा आहे. ट्रॅक उभारणीसाठी आवश्यक मुरुमाचे व्यवस्थित पिचिंग करण्यात आले नाही. तसेच वाहन टेस्ट ट्रॅकच्या सुरूवातीलाच साठलेल्या मुरूमामुळे ट्रॅकवर जाणार्‍या वाहनांचा वेग कमी होत आहे.  

ट्रॅकवर करण्यात आलेल्या डांबराचे अस्तरीकरण व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे ट्रॅकवरच वाहनचालकांना चढ-उताराची शर्यत पार करावी लागत आहे. अवघ्या तीन ते चार दिवसांत ट्रॅकची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. बे्रक टेस्ट केल्यानंतर वाहन घसरून 30 ते 40 मीटर अंतरावर खचलेला ट्रॅक दिसून येत आहे. डांबरीकरणाचे अस्तरीकरण आणि पिचिंग व्यवस्थित न झाल्यामुळे डांबर उखडत आहे. तसेच ट्रॅकच्या दोन्ही बाजूला मोठी खदान असल्यामुळे बे्रक दाबल्यानंतर वाहन ताब्यात राहिले नाही, तर अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.