Fri, Apr 26, 2019 00:01होमपेज › Pune › आधी घर पाहतो; मग ठरवितो

आधी घर पाहतो; मग ठरवितो

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 10:43PMपिंपरी : वर्षा कांबळे

आमचे प्रतिनिधी तुमचे घर पाहायला येतील आणि मग तुम्हाला प्रवेश द्यायचा की नाही हे ठरविले जाईल असे सांगून शाळा प्रशासन आरटीईच्या पालकांना पिटाळून लावत आहेत. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश राखीव असतानाही शहरातील खासगी विनाअनुदानित शाळांकडून विविध कारणे सांगून अडवणूक केली जात आहे. 

आरटीई प्रवेशाची सध्या तिसरी फेरी सुरू आहे. पालक ज्या ज्यावेळी प्रवेश घेण्यास जातात त्यावेळी नाना कारणे सांगून पालकांची शाळा प्रशासनाकडून अडवणूक करण्यात येत आहे. शाळांकडून विद्यार्थ्याच्या घरी जावून घर कशाप्रकारचे आहे. त्याला खरंच गरज आहे की नाही. त्याची आर्थिक स्थिती कशी आहे. तो फी भरण्यास सक्षम आहे की नाही, अशा चौकशा करण्याचा उद्योग केला जात आहे. तसेच काही शाळा पालकांना सर्व कागदपत्रे रजिस्टर करुन आणायला सांगत आहेत. यामध्ये उत्पन्नाचा व जातीचा दाखला शासन देते आणि जन्म दाखला महापालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद येथून मिळतो. मग शाळांना आणखी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्याची गरज काय असा संतप्त सवाल पालकांतून केला जात आहे. मात्र, काही पालक अशिक्षित असल्यामुळे शाळांच्या दडपणाखाली येत आहेत. शाळांना उलट जाब विचारण्यास पालकांची हिंमत होत नाही. शाळा प्रशासन याचा फायदा घेवून पालकांना पिटाळून लावण्याचे काम करत आहे. 

प्रवेशद्वारासमोरच पैशांची मागणी

काही शाळा तर आमची कोर्टात केस सुरु आहे असे सांगून पालकांना प्रवेश नाकारत आहेत. कोर्टाने शाळांना नियमाप्रमाणे प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील काही शाळा प्रवेशद्वारावरच पालकांची अडवणूक करत आहे. 

पालक हातात कागदपत्रे घेवून शाळेच्या बाहेर थांबतात. मात्र, सुरक्षारक्षक त्यांना शाळा प्रशासनाच्या आदेशानुसार आत सोडत नाही. तर  काही ठिकाणी आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश असतानाही शाळांचे संस्थाचालक प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळतात. आम्हांला शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा परतावा पूर्ण दिला नाही हे कारण सांगून  पालकांकडून 5 ते 15 हजारांपर्यंत पैशांची मागणी केली जाते.