Sat, Aug 24, 2019 21:30होमपेज › Pune › पद्मनाभन पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त

पद्मनाभन पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अकरा अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश गृहविभागाने सोमवारी दुपारी काढले. नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांची वर्णी लागली आहे. तर पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून डॉ. के. वेंकटेशम यांची नियुक्ती झाली आहे,  कारागृह विभागाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.

नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून आतापर्यंत कार्यरत असलेले डॉ. के. वेंकटेशम हे मूळचे हैद्राराबाद येथील असून, ते 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपुरातील संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली. त्यापूर्वी त्यांनी पोलिस मुख्यालय मुंबई येथे पोलिस प्रशिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या काळात प्रशिक्षण केंद्रात मोठे बदल झाले. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.

अतिरिक्त मुंबई महानगर (प्रशिक्षण व विशेष विभाग) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे़. त्यावेळी त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. त्यापूर्वी नक्षलप्रभावित गोंदिया येथे काम करताना त्यांनी नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी माहितीचे जाळे तयार केले होते. यातूनच त्यांनी नक्षलवादी गटाच्या कमांडरला अटक केली होती. नवे नक्षलवादी तयार होऊ नयेत, यासाठी अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले होते. 

मालेगाव आणि उस्मानाबाद या संवेदनशील ठिकाणीही त्यांनी काम केले़  त्यांच्या कार्याचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान करण्यात आला़. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी नोंदणी व इमिग्रेशनचे मुंबई विशेष शाखेत काम केले आहे़. गुप्तचर संस्थेचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़. अत्यंत शिस्तप्रिय, कडक आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून डॉ. वेंकटेशम यांची पोलिस दलात ओळख आहे. 
31 मार्च 2016 रोजी पुणे पोलिस आयुक्त म्हणून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला़.

त्या पुण्याच्या दुसर्‍या महिला पोलिस आयुक्त ठरल्या़  शहरातील कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी अनेक चांगली पावले त्यांनी उचलली़. विशेषकरून महिला- तरुणींच्या सुरक्षिततेसाठी योजना बनविल्या़  बडीकॉप, पोलिस काका यासारखे उपक्रम सुरू केले़  ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, 24 तास हेल्पलाईन सुविधाही सुरू केली. गेल्यावर्षी बडीकॉपसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिक्कीचा पुरस्कारही पोलिस दलाला मिळाला आहे. यंदा ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या कामगिरीबद्दल देशातील सर्वात नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्याचा गौरव करण्यात आला़. 

अधिकार्‍यांची नावे व कंसात बदली कोठून, कोठे झाली...

हेमंत नामदेवराव नगराळे (नवी मुंबई पोलिस आयुक्‍त ते अप्पर पोलिस महासंचालक, सामुग्री व तरतूद, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), परमबीर सिंह (पोलिस आयुक्‍त ठाणे, ते अप्पर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई), रजनीश शेठ (प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग ते अप्पर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), डॉ. भूषणकुमार उपाध्याय (कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक ते पोलिस आयुक्‍त, नागपूर), संजय कुमार (अप्पर महासंचालक, सीआयडी ते पोलिस आयुक्‍त, नवी मुंबई), संजीवकुमार सिंघल (सीआयडी, अभिलेख केंद्र) ते अप्पर पोलिस महासंचालक, सीआयडी), विवेक फणसळकर (अप्पर पोलिस महासंचालक, एसीबी ते पोलिस आयुक्‍त, ठाणे शहर), आर. के. पद्मनाभन (अप्पर पोलिस महासंचालक, वाहतूक ते पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड), अमिताभ गुप्‍ता (अप्पर पोलिस महासंचालक, नियंत्रक वैधमापनशास्त्र ते प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग आणि श्रीमती रश्मी शुक्ला (पोलिस आयुक्‍त, पुणे ते अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य).

वृत्तसंपादक ते पोलिस आयुक्त

‘पद्मनाभन’ यांना पोलिस खात्याच्या दांडग्या अनुभवाव्यतिरिक्त पत्रकारितेचा देखील अनुभव आहे. त्यांनी सन 1986 ते 1989 मध्ये वृत्त संपादक म्हणून एका दैनिकात काम केले आहे. त्यानंतर माहिती व जनसंपर्क मंत्रालयात ओएसडी म्हणून देखील 1989 ते 1991 या कालावधीत काम केले आहे. 

पद्मनाभन यांचे बीएससी केमेस्ट्रीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते 1991 साली भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) भरती झाले. त्यानंतर त्यांनी सिरोंचा येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. नंतर चंद्रपूर येथे अप्पर अधीक्षक आणि चंद्रपुर, सोलापूर, कोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून त्यांनी पदोन्नतीवर काम पहिले. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर त्यांनी युएन मिशन कोसोवा येथे देखील काम केले. काही कालावधीनंतर ते पुन्हा कोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून रुजू झाले.

राज्य राखीव पोलिस दल (मुंबई) येथे कमांडंट, एअर इंडियात उपसंचालक काम केल्यावर त्यांची मुंबई येथे अप्पर आयुक्त म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली. म्हाडा येथे विशेष महानिरीक्षक या पदावर त्यांची पदोन्नती झाली. पुन्हा काही कालावधीसाठी पद्मनाभन यांनी सेबी येथे कार्यकारी संचालक/सीव्हीओ या पदावर काम केले. या विभागांमध्ये काम केल्यावर मागील दोन वर्षांपासून ते अप्पर पोलिस महासंचालक या पदावर महामार्ग सुरक्षा विभागात काम पाहत होते. या सर्व विभागांच्या अनुभवानंतर त्यांना पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून बहुमान देण्यात आला आहे.