Sat, Apr 20, 2019 10:03होमपेज › Pune › पहिली, आठवीची पुस्तके अद्याप बाजारातच नाहीत

पहिली, आठवीची पुस्तके अद्याप बाजारातच नाहीत

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

बालभारतीकडून नव्या अभ्यासक्रमाची इयत्ता दहावीची पुस्तके जरी बाजारात उपलब्ध करून देण्यात आली असली, तरीही अद्याप इयत्ता पहिली व आठवीची नवी पुस्तके उपलब्ध झालेली दिसून येत नाहीत. त्यामुळे ही पुस्तके नेमकी कधी उपलब्ध होणार, असा प्रश्‍न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

यंदा दहावीबरोबरच पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रमही बदलला आहे. दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने सर्व विषयांची पुस्तके एप्रिलमध्येच बाजारात आली. परंतु, या पुस्तकांच्या छपाईत पहिली आणि आठवीची पुस्तके अडकली असून, अद्याप ही पुस्तके बाजारात दाखल झालेली नाहीत.

जून महिन्यात शाळा सुरू होण्याच्या तोंडावर निर्माण होणारा पुस्तकांचा तुटवडा, पाऊस, शाळेच्या इतर तयारीच्या घाईमुळे काही पालक मे महिन्यातच पुस्तकांची खरेदी करून ठेवतात. परंतु, मे महिना संपायला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक असतानादेखील अद्याप पहिली आणि आठवीच्या नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेच बाजारात न आल्याने पालकांचा खोळंबा झाला आहे.

मागील वर्षी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे बालभारतीसाठी सोपे होते. कारण फक्‍त दोन इयत्तांच्या नव्या पाठ्यपुस्तकांची छपाई करायची होती. परंतु, यंदाचे आणि पुढचे वर्ष बालभारतीसाठी कठीण आहे, कारण तीन इयत्तांच्या सर्व माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांची छपाई करायची आहे. सध्या बाजारात इयत्ता आठवीच्या इंग्रजी माध्यमाची केवळ इतिहास, इंग्रजी आणि हिंदी विषयाची पुस्तके उपलब्ध आहेत. तर मराठी माध्यमाची इंग्रजी आणि गणित विषयाची पुस्तके उपलब्ध आहेत.

परंतु, इयत्ता पहिलीचे एकही पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध नसल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली आहे. तर जून 2018 च्या मध्यापर्यंत म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वी इयत्ता पहिली व इयत्ता आठवीची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियान योजनेमार्फत पोहोच केली जातील. तसेच बाजारामध्ये विक्रीसाठी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जातील, अशा पद्धतीने नियोजन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळतील, याबाबत बालभारतीकडून दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती बालभारतीच्या सूत्रांनी दिली आहे.