Tue, Mar 26, 2019 19:58होमपेज › Pune › वडगाव नगराध्यक्षपदाचे प्रथम मानकरी मयूर ढोरे

वडगाव नगराध्यक्षपदाचे प्रथम मानकरी मयूर ढोरे

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 20 2018 10:47PMवडगाव मावळ  : वार्ताहर 

वडगाव नगरपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत वडगाव-कातवी नगरविकास आघाडीचे मयूर ढोरे यांनी 910 मतांनी विजयी होत प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला, असून सत्तेचे गणित मात्र त्रिशंकूच राहिले आहे.वडगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप, श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी व वडगाव-कातवी नगरविकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. शुक्रवार (दि. 20) सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, सहाय्यक रणजीत देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल भवनमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

नगराध्यक्षपदासाठी भास्करराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे व मयूर ढोरे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. यामध्ये मयूर ढोरे यांना 4 हजार 333 मते मिळाली. भास्करराव म्हाळसकर यांना 3 हजार 423 मते, तर पंढरीनाथ ढोरे यांना 3 हजार 363 मते मिळाली. त्यामुळे मयूर ढोरे हे 910 मतांनी विजयी झाले.नगरसेवकपदासाठीही काही प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. यामध्ये प्रभाग 9 मधील प्रवीण चव्हाण यांनी केवळ 4 मतांनी विजय मिळविला असून, सुरेश जांभूळकर यांचा पराभव झाला; तसेच प्रभाग 3 मधील शारदा ढोरे यांनी फक्त 10 मतांनी अश्‍विनी तुमकर यांचा पराभव करुन विजय मिळविला.

प्रभाग 6 मध्ये पूजा वहिले ह्या 49 मतांनी, तर प्रभाग 12 मध्ये दिलीप म्हाळसकर हे 28 मतांनी विजयी झाले. त्यामुळे संबंधित लढती ह्या अत्यंत चुरशीच्या ठरल्या; तसेच प्रभाग 1 मधील दशरथ केंगले यांनी सर्वाधिक 430 मतांनी विजय मिळवला असून, प्रभाग 13 मधील सुनीता भिलारे यांनी 377 मतांनी, अर्चना म्हाळसकर यांनी 325 मतांनी विजय मिळवला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मिरवणुका काढून, भंडार्‍याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते 

प्रभाग 1 : दशरथ केंगले(564 मते), प्रभाग 2 : दिनेश ढोरे (492 मते), प्रभाग 3 : शारदा ढोरे (294 मते), प्रभाग 4 : राहूल ढोरे (351 मते), प्रभाग 5 : पूनम जाधव (442 मते), प्रभाग 6 : पूजा वहिले (330 मते), प्रभाग 7 : चंद्रजीत वाघमारे(425 मते), प्रभाग 8 : माया चव्हाण(272 मते), प्रभाग 9 : प्रवीण चव्हाण(299 मते), प्रभाग 10 : प्रमिला बाफना (433 मते), प्रभाग 11 : किरण म्हाळसकर(446 मते), प्रभाग 12 : दिलीप म्हाळसकर(201 मते), प्रभाग 13 : सुनिता भिलारे(542 मते), प्रभाग 14 : दिपाली मोरे(238 मते), प्रभाग 15 : राजेंद्र कुडे (344 मते), प्रभाग 16 : सायली म्हाळसकर(283 मते), प्रभाग 17 : अर्चना म्हाळसकर(553 मते)

सत्तेचे गणित त्रिशंकू 

दरम्यान, एकूण 17 जागांपैकी भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवता आला असून श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीने 6 तर वडगाव-कातवी नगरविकास आघाडीने 4 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, माजी उपसभापती प्रवीण चव्हाण हे अपक्ष व मनसेच्या सायली म्हाळसकर यांनी विजय मिळवला, त्यामुळे सत्तेचे गणित त्रिशंकूच राहिले आहे. वडगाव नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदावर विजय मिळविल्यानंतर मयूर ढोरे यांच्या समर्थकांनी मिरवणूक व भंडार्‍याची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला