Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › वाल्हेकरवाडीत गुंडावर गोळीबार

वाल्हेकरवाडीत गुंडावर गोळीबार

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:40AM
पिंपरी : प्रतिनिधी 

रस्त्यावरील दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तडीपार सराईत गुंडावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये गुंडास दोन गोळ्या लागल्या असून, त्याचा मित्रही जखमी झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौक येथे सोमवारी (दि. 19) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. 

जयवंत भगवंत चितळकर (30, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला गोळ्या लागल्या असून, त्याच्यावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मित्र नीलेश कोळपे (रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) हाही जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा घनपत सगर यांनी फिर्याद दिली आहे, तर अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी जयवंत चितळकर याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला चिंचवड पोलिसांनी तडीपार केले होते. 30 डिसेंबर 2017 रोजी त्याची तडीपारीची कारवाई संपलेली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जयवंत आणि नीलेश हे दोघे सोमवारी रात्री वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्यात उभी केल्याने रस्त्याने जाणार्‍या वाहनांना अडथळा येत होता. एका कारचालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून कारचालक आणि त्यांच्यात वादावादी झाला. काही वेळाने कारचालकाने त्याच्या इतर साथीदारांना तेथे आणले व दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये नीलेश कोळपे जखमी झाला. या वेळी या टोळक्यातील एकाने जयवंत चितळकर याच्यावर गोळीबार केला. गोळी जयवंत याच्या डाव्या दंडात आणि हाताला लागली. याबाबत जखमींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी प्रथम सळई लागली असल्याचे सांगत नकारात्मक व संशयास्पद उत्तरे दिली. त्यामुळे माहिती घेऊन पोलिसांनी स्वतः अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, विनायक साळुंखे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक प्रशांत महाले, सुरेखा सागर आदींनी भेट दिली.

Tags : pune, pune news,Firing, memberof gang, Walhekarwadi