Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Pune › शिक्रापूर यात्रा समितीच्या अध्यक्षावर गोळीबार

शिक्रापूर यात्रा समितीच्या अध्यक्षावर गोळीबार

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 1:03AMशिक्रापूर : वार्ताहर

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि हॉटेल व्यावसायिक असलेले राजेंद्र भालचंद्र करंजे (वय 46) यांच्यावर गुरुवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार करून करंजे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटारूंनी चोरली असून, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांपूर्वी करंजे हे चार दिवस बेपत्ता झाले होते. परिणामी या हल्ल्यामागील गूढ वाढले आहे. 

राजेंद्र करंजे हे बुधवारी (दि. 4) यात्रेतील कुस्त्यांचा आखाडा करून यात्रा कमिटीच्या  सदस्यांसोबत रात्री तमाशा पाहत होते. पहाटे अडीचच्या सुमारास करंजे यांना झोप येऊ लागल्याने ते झोपण्यासाठी घरी गेले. घराजवळ गेल्यानंतर ते मनाली हॉटेलसमोर दुचाकी उभी करत असताना अचानक दुचाकीवरून तिघे जण त्यांच्या पाठीमागे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने करंजे यांच्यावर पिस्तूलमधून गोळी झाडली. ती गोळी करंजे यांच्या मांडीतून आरपार गेली. त्यांनतर लगेच त्याने दुसरी गोळी झाडली, ती करंजे यांना लागली नाही. त्यांनतर पुन्हा तिसरी गोळी झाडली असता ती गोळी करंजे यांच्या डाव्या मनगटाला  लागली. 

यावेळी करंजे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील दोघेजण त्याठिकाणी आले असता हल्लेखोरांनी करंजे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली व हातातील सोन्याचे कडे काढत असताना त्यांना कडे काढता आले नाही. तोपर्यंत शेजारील दोघेजण आल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पाबळच्या दिशेने पळून गेले.  जखमी करंजे यांच्यावर  वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

 

Tags : Shirur, Shirur news, crime, Rajendra Karanje, Firing,