Mon, Jan 21, 2019 15:10होमपेज › Pune › तुरुंगाधिकार्‍यावर येरवडा कारागृहासमोर गोळीबार

तुरुंगाधिकार्‍यावर येरवडा कारागृहासमोर गोळीबार

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी 

येरवडा कारागृहातील तुरुंगाधिकारी मोहन पाटील यांच्यावर कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या पार्किंग परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही आणि ते या प्रसंगातून बालंबाल बचावले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहन पाटील हे येरवडा कारागृहात तुरुंगाधिकारी श्रेणी 2 पदावर कार्यरत आहेत. ते शुक्रवारी सकाळी ड्यूटीवर हजर होण्यासाठी सहाच्या सुमारास कारागृहाजवळ आले. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून ते कारागृहाच्या प्रवेशद्वाराकडे  कारागृहाच्या भिंतीजवळून पायी जात असताना त्यांच्या समोरून कॉमर्स झोनकडून अ‍ॅक्टिवावरून तोंडाला रुमाल बांधून दोघे जण येत होते. त्यातील मागे बसलेल्या एकाने थेट त्यांच्यावर पिस्तूलातून एक गोळी झाडली. त्यावेळी पाटील हे तत्काळ बाजूला झाले. त्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातील छत्री त्यांच्या दिशेने भिरकावली. पाटील यांना आक्रमक झालेले पाहून, दोघेही गोंधळून गेले आणि पुटपुटत दुचाकीवरून भरधाव वेगात निघून गेले. या प्रकारानंतर कारागृहातील कर्मचारी बाहेर आले. आजूबाजूला मॉर्निंग वॉकला आलेले नागरिकही तेथे गोळा झाले. येरवडा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, दोघेही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.