पुणे : प्रतिनिधी
दत्तवाडीत मध्यरात्री वाढदिवस साजरा करताना केवळ एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून दोन गटांत प्रचंड राडा झाला. त्यानंतर सराईताने अंदाधुंद गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. यावेळी बंदुकीतून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मांडीच्या वरच्या भागात गोळी घुसल्याने एक सराईत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. दोन्ही गटांनी केलेल्या तक्रारीवरून परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सूरज ऊर्फ सूरज्या भालचंद्र यशवद (वय 30, रा. राजेंद्रनगर) हा गोळीबारात जखमी झाला आहे. याप्रकरणी मयूर सुनील भगरे (वय 21, रा. म्हात्रे पुलाजवळ, दत्तवाडी) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी नुसार, रोहित उटाडा, विजय ननावरे, अक्षय मारणे ऊर्फ मट्टा यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वैभव रोकडे (वय 21) याने दिलेल्या फिर्यादीवरून 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित उटाडा याचा रविवारी (24 जून) वाढदिवस होता. त्याचे मित्र दत्तवाडीतील शंकर मंदिराजवळ मध्यरात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी सूरज यशवद आणि मयूर तेथे बोलत उभे होते. त्यावेळी आरोपी रोहित उटाडा याने ‘आमच्याकडे काय रागाने पाहता’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावरून वाद सुरू झाला आणि टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर रोहित उटाडा याने पिस्तूल काढत अंदाधुंद गोळीबार केला. यात एक गोळी सूरज यशवद याच्या मांडीच्या वरच्या भागात घुसली. वैभव रोकडे याने दिलेल्या तक्रारीत एल. झेड. ग्रुपच्या तरुणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाढदिवस अन् सराईत गुन्हेगार
रोहित उटाडा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर दत्तवाडी व स्वारगेट पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. तर, ननावरे आणि मारणे यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. तसेच सूरज यशवद याच्यावरही तीन गुन्हे दाखल आहेत. अनिल तुपीरे याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच, लकी व जुबेर हेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.