Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Pune › प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:31AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कात्रज-फुरसुंगी बायपास रोडवर मंतरवाडी भागात असणार्‍या  प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत दोन गोडाऊनसह दोन चार चाकी आणि दोन दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

कात्रज-फुरसुंगी बायपास रस्त्यावर मंतरवाडी भागात मोकळ्या जागेत प्लॉस्टिक, टाकाऊ इलेक्ट्रिक वायर तसेच भंगार सामान ठेवण्यासाठी गोडाऊन तयार करण्यात आली आहेत. 25 गुंठे जागेमध्ये दोन वेगवेगळी ही गोडाऊन आहेत. शेख (पूर्ण नाव नाही) यांची ही गोडाऊन असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. दरम्यान गोडाऊनच्या समोर दुमजली इमारत आहे. त्याठिकाणी येथील कामगार राहतात. तर, या गोडाऊनजवळ सीएनजीचा प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. 

दरम्यान मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक यातील एका गोडाऊनला आग लागली. लोकवस्ती नसल्याने काही काळ ही घटना समजली नाही. मात्र, अचानक मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे येथे राहणार्‍या कामगार तसेच नागरिकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. हडपसर तसेच मध्यवर्ती अग्निशामक दलाचे तीन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीने दोन्ही गोडाऊनला विळखा घातला होता. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने आगीवर नियत्रंण मिळविण्यात जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. या भीषण आगीत दोन गोडाऊनसह बाहेर लावण्यात आलेल्या दोन कार आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. पहाटेपर्यंत पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आण्यात जवानांना यश आले. त्यानंतर जळालेल्या साहित्य गार करण्यासाठी सायंकाळपर्यंत पाण्याचा मारा करण्यात येत होता. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या आगीमागचे कारण अद्यााप समजू शकले नाही, असे जवान जाधव यांनी सांगितले.  

दरम्यान या गोडाऊनच्या काही अंतरावरच सीएनजी प्रकल्प सुरु आहे. मात्र, जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या अगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे. अग्निशामकचे अधिकारी दत्तात्रय नागलकर, शिवाजी चव्हाण तसेच तांडेल सुभाष जाधव, जवान मंगेश टकले, संदिप पवार, निलेश लोणकर, धनवडे यांच्यासह पंचवीस ते तीस जवानांनी आगीवर नियत्रंण मिळविले.