Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या 922 बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा

‘पीएमपी’च्या 922 बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या कंत्राटदारांच्या आणि प्रशासनाच्या बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले असून, आतापर्यत सुमारे 922 बसेसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून सीएनजीच्या बसेसना आगी लागण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र ही  यंत्रणा यापूर्वीच बसविण्यास हवी होती अशी चर्चा प्रवाशी मंचाच्या सदस्यांनी केली आहे. मात्र उशीरा का होईना प्रशासनास जाग आल्यामुळे पुढील काळात बसेसना आगी लागण्याचा घटना घडल्यास त्या विझवणे सोपे जाणार आहे. उर्वरित बसेसमध्ये देखील अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असून, पुढील काही महिन्यात ते पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाने दिली..

पीएमपीसह खासगी कंत्राटदारांच्या मिळून एकूण दोन हजार 39 बसेस  ताफ्यात आहेत. त्यामध्ये प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या मिळून 1224 सीएनजी  इंधनावर चालणा-या बसेस आहेत. मागील सुमारे दीड वर्षात सीएनजी इंधनावरील सुमारे 14 बसेस शॉर्ट सर्किट होऊन आगी लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व बसेस जळून खाक झालेल्या आहेत. पीएमपीच्या सर्वच बसेसमध्ये जुन्या काळातील बाटलीबंद (छोट्या प्रकारातील ) अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आलेल्या होत्या. मात्र त्या जुनाट झालेल्या यंत्रणेचा फारसा वापर आणि उपयोग कधीच झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. पीएमपी प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी बसेसमध्ये नवीन पध्दतीची अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एका खासगी एजन्सीला नवीन अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम देण्यात आले आहे. मागील काही महिन्यापासून बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यास सुरूवात झाली असून, आतापर्यत सुमारे 922 बसेसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामध्ये तेजस्विनी (मिडी बसेस)- 96, न.ता.वाडी-137,स्वारगेट-21, पुणे स्टेशन-111,निगडी/भोसरी-53, भेकराई-68, शेवाळवाडी-55, बालेवाडी-53 या बस आगारामधील बसेसना अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

Tags : Pimpri, Pune, Fire extinguishers,  922, buses, PMP