Mon, Jun 17, 2019 00:14होमपेज › Pune › बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक

बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:31AM

बुकमार्क करा

पुणे/बिबवेवाडी :  

गुलटेकडी येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असणार्‍या प्रसिद्ध गोल्डन बेकरीच्या ‘परफेक्ट’ कारखान्याला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. डिझेलची भट्टी सुरू असताना स्पार्किंग होऊन आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारखान्याला लागूनच साखरे वसाहत ही झोपडपट्टी आहे. दोन वषार्र्ंपूर्वी या झोपडपट्टीत मोठी आग लागली होती. 

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीचे मालक नसीर अहंमद अन्सारी यांचा गुलटेकडी परिसरात दहा हजार फुटामध्ये ‘परफेक्ट’ नावाने बेकरीतील खाद्यपदार्थ बनविण्याचा कारखाना आहे. एक इमारत असून, त्याशेजारी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. दरम्यान, याठिकाणी एकूण सहा भट्ट्या आहेत. वीज आणि डिझेलचा (ओव्हन भट्टी) या भट्ट्या आहेत. याठिकाणी बेकरी पदार्थ बविण्यासाठी पंचवीस ते तीस कामगार आहेत. याठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारखान्याला लागूनच साखरे वसाहत (झोपडपट्टी) आहे.  सोमवारी पदार्थ बनविण्याचे काम  सुरू असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील एका डिझेल भट्टीत स्पार्किंग झाले. त्यामुळे काही वेळातच आग लागली. कामगारांनी आग पाहिली. त्यांनी आरडा-ओरडा केला व नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचा भडका उडाला. त्यानंतर मात्र कामगारांनी तेथून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.

मध्यवर्ती, कोंढवा आणि येरवडा अग्निशामकचे प्रमुख सुनील गिलबिले, रमेश गांगड, समीर शेख आणि जवान पायगुडे, छगन मोरे, प्रकाश शेलार, संदीप घडसी, राहुल नलावडे, अदिल शेख यांच्यासह 25 ते 30 जवान पाच गाड्या आणि दोन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीने कारखान्याला चहुबाजूने विळखा घातला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली.

कामगार वेळीच कारखान्याच्या बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, बेकरीतील बनविण्यात आलेलेे पदार्थ, रॉ मटेरियल, तेल, बेकरी पदार्थ बनविण्यासाठी ठेवण्यात आलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशामकच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी येत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. साखरे वसाहत झोपडपट्टीला आग पोहचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी या झोपडपट्टीत सिलिंडरचा स्फोट होऊन 67 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. 

इंदिरानगर वसाहतीमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या कारखानदारांनी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच, परवाना घेतला नाही, अशांची चौकशी करून करवाई करण्यात येईल, असे स्थानिक नगरसेवक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले तर, आगीबद्दल कारखाना मालकाकडून सर्व परवानग्यांची माहिती घेतली जाईल.

दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फारुख काझी यांनी सांगितले. या कारखान्यात राजरोसपणे परराज्यातील बालकामगार आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. याबाबत यापूर्वीही पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नाही, असे भाजप कार्यकर्ते गणेश शेराला यांनी सांगितले.