Wed, Aug 21, 2019 19:48होमपेज › Pune › ललित कलेकडे कल

ललित कलेकडे कल

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 12:51AMपुणे : गणेश खळदकर 

दहावीनंतर विद्यार्थ्यांचा कल नेमका कोणत्या शाखेकडे आहे. हे शासनाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वात जास्त म्हणजे तब्बल 45 हजार 963 विद्यार्थ्यांनी ललित कला या विद्याशाखेत जाण्याचा कल दिला असल्याचे कल चाचणीच्या अहवालावरून दिसून आले आहे. परंतु त्या प्रमाणात शहरातील महाविद्यालयांमध्ये सुविधा तसेच जागांची वानवा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल दुसरीकडेच वळणार असल्याचे ललित कला क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे आहे. याची शासनाने कलचाचणी घेतली आहे. त्याचा अहवाल देखील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यात वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे.मात्र पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल हा नेहमीप्रमाणेच वेगळा असल्याचे दिसून आले आहे.तब्बल 45 हजार 963 विद्यार्थ्यांनी ललित कला या विद्याशाखेला प्राधान्य दिले आहे.तर 45 हजार 524 विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. शहरात वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम शिकवणारे अनेक महाविद्यालये आहेत.मात्र ललितकला विद्याशाखेचे अभ्यासक्रम घेणार्‍या महाविद्यालयांची संख्या अत्यंत कमी आहे.

ललितकला या विद्याशाखेअंतर्गत फाईन आर्ट, अ‍ॅप्लाईड आर्ट, परफॉर्मिंग आर्ट च्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम राबविण्यात येतात. चित्रकला, शिल्पकला, मेटल क्राफ्ट, टेक्सटाईल डिझाइन, सिरॅमिक, इंटिरियर डेकोरेशन या सर्व शाखा फाइन आर्टमध्ये, तर पेंटिंग, टेक्स्टाइल डिझाइन, इंटेरिअर डेकोरेशन,शिल्पकाम,मेटल वर्क, सेरॅमिक्स संबंधित अभ्यासक्रम अ‍ॅप्लाईड आर्टमध्ये येतात. तर संगीत, नाट्य, नृत्य तसेच अन्य काही अभ्यासक्रम परफार्मिंग आर्टमध्ये मोडतात. यासह ग्राफिक डिझाइन, गेम डिझाइन, आर्किटेक्टमधील रचनात्मक काम, फॅशन टेक्नॉलॉजी, ब्यूटी आणि वेलनेस, लँडस्केप डिझायनिंग, वेब डिझायनिंग, इंटिरिअर डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन, फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रांतील संधी आजच्या विद्यार्थ्यांना खुणावत आहेत.

सिनेसृष्टीत आलेले व्हीएफएक्स तंत्र, साउंड इफेक्ट, फॅशन स्टेटमेंट याकडे मुलांचा ओढा आहे, तर एकाच कलाकृतीची होणारी भाषांतरे या संकल्पनेनुसार मुलांमध्ये डबिंग आर्टिस्ट होण्याचे स्वप्न असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा कल ललितकलेकडे आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात संबंधित अभ्यासक्रमांच्या जागा फारच कमी आहेत. महाविद्यालयांमध्ये सुविधांची वाणवा आहे.नृत्य,नाटक,संगितासंबधित तर केवळ दोन संस्थांमध्ये मीळून 60 जागा आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल जरी ललितकलेकडे असला शहरातील महाविद्यालयांची परिस्थिती पाहता हा कल दुसरीकडे वळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.