होमपेज › Pune › 33 रुपयांच्या दाखल्यासाठी 250 रुपये;  अधिक रक्कम केली जाते वसूल

जातीच्या दाखल्यासाठी आर्थिक लूट

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

मामलेदार कचेरी आणि शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाबाहेरील एजंट, महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार केंद्र चालकांकडून विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे.

प्रवेश प्रक्रिया, नोकरभरतीसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी सध्या विद्यार्थी व पालकांची या केंद्रांवर गर्दी होत आहे. वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, म्हणून काहीजण नियमापेक्षा अधिक रक्कम देतात. मामलेदार कचेरीसमोरील एंजटांकडून डोमिसाइलसाठी 500 रुपये, जातीच्या दाखल्यासाठी दीड हजार रुपये आणि इतर दाखल्यांसाठी 250 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची मागणी केली जात आहे. तसेच, ई-महासेवा केंद्र आणि आपलं सरकार केंद्रातही वेगळी परस्थिती नाही. अनेकांना दाखले लवकर पाहिजे असतात, त्यामुळे त्यांच्याकडून त्यापेक्षाही अधिकची रक्कम एजंटांकडून वसूल केली जात आहे. शिवाजीनगरच्या शासकीय गोदामात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

बारावी, ‘सीईटी’ व ‘नीट’ या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले आवश्यक असतात. तेे मिळविण्यासाठी ई-महासेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये गर्दी करत आहेत.

आता दहावीचाही निकाल लागला असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुणे शहर तहसील कार्यालयामध्ये महा ई-सेवा केंद्रांनी कोणत्या दाखल्यांसाठी किती शुल्क आकारावे याची माहिती उपलब्ध नाही.

दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे ः

राष्ट्रीयत्वाचा दाखला - अर्जदाराच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, डोमिसाइल दाखला, रेशनकार्ड प्रत. उत्पन्न दाखला - तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स, अडीच लाखांच्या वर उत्पन्न असणार्‍यांना वेतन प्रमाणपत्र  नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र - अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदार यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स, साडेसहा लाख उत्पन्न असणार्‍यांना कार्यालयाचे पत्र. जातीचा दाखला- स्वतःचा व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स, संबंधित तालुक्यातील पुरावा सादर करणे. डोमिसाईल - अर्जदाराचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड प्रत.

लेखी तक्रार आल्यास कारवाई करू 

जिल्ह्यात विविध दाखले देण्यासाठी सुमारे 384 केंद्रे असून या सर्व केंद्रांवर दाखल्यांसाठी दर निश्‍चित करण्यात आले आहेत. यापेक्षा अधिक रक्कम कोणी मागत असेल तर संबंधितांनी लेखी अथवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केल्यास त्या तक्रारीची चौकशी केली जाते. जर यामध्ये संबंधित केंद्रचालक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते.  - प्रवीण भालेराव, व्यवस्थापक, महाऑनलाईन, पुणे.

आम्ही पुरव्यानिशी तक्रार केली

मामलेदार कचेरी परिसरामध्ये असलेले काही ई-महासेवा केंद्रचालक ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे नागरिकांकडून घेत आहेत. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही या केंद्रांविरोधात पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.  - गीता दळवी, तहसीलदार, पुणे शहर.