होमपेज › Pune › आंतरजातीय विवाहितांना आर्थिक हातभार

आंतरजातीय विवाहितांना आर्थिक हातभार

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 1:19AMपुणे : नवनाथ शिंदे

समाजातील अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी शासनाच्या वतीने आंतरजातीय विवाहितांना आर्थिक सहाय्य केले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह करणार्‍या 17 दाम्पत्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने 50 हजार रुपयांच्या मदतीचा हात दिला आहे,  तर 294 प्रस्तावांपैकी 280 अर्जदारांना योजनेचा लाभ देण्याची  कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. 

गावोगावची जातीयता कमी होण्याच्या हेतूने जिल्ह्यातील ग्रामपंचायती, चावडी, प्रशासकीय कार्यालयामार्फत आंतरजातीय विवाहितांना प्राधान्याने मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाहितांसाठी 2017-18 च्या आर्थिक आराखड्यात जिल्हा परिषदेने 70 लाखांची तरतूद केली होती, तर केंद्र शासनाच्या वतीने 70 लाखांचा निधी समाजकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार 1 कोटी 40 लाख रुपयांच्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 294 अर्ज समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली असून, लाभार्थ्यांना लवकरच लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्याची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती  सवर्ण हिंदू असणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र,  वधू-वरांचा शाळा सोडल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. आंतरजातीय विवाह योजनेत मागास प्रवर्गातील अनुसूचित जाती- जमातींना सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार अर्थसहाय्यतेच्या 15 हजार रकमेत 35 हजारांची वाढ करून 50 हजार रुपये देण्यात येत आहेत.