Wed, May 22, 2019 14:29होमपेज › Pune › फायनान्स कंपनीच्या मालकाची आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या मालकाची आत्महत्या

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:15AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील एका फायनान्स कंपनीच्या मालकाने कार्यालयातच केबिनमध्ये स्वत:च्या पिस्तुलातून छातीत गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील तुपे नाट्यगृहाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, फायनान्स कंपनीत आलेल्या अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्याकडे ‘सुसाईड नोट’ मिळाली आहे. अरविंद ऊर्फ पिंटूशेठ लक्ष्मण फाळके (वय 58, रा. अमर कॉटेज, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांची सौदामिनी फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी आहे. हडपसरमधील तुपे नाट्य गृहाजवळ फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत दोन भागीदार होते. मात्र, काही कालावधीपूर्वी दोन्ही भागीदार ही कंपनी सोडून गेले होते. दरम्यान, कंपनीवर इतरांचे देणे मोठ्या प्रमाणात होते. तसेच, इतरांकडून पैसे येणेही बाकी होते; मात्र, त्याची वसुली होत नव्हती. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले होते. व्यवसाय अडचणीत आला होता. दरम्यान त्यांची यापूर्वी चिटफंड कंपनीही होती, असे वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, शुक्रवारी दुपारी ते कार्यालयात आले. घरून आलेला डबा घेत त्यांनी जेवणही केले. त्यानंतर त्यांनी कार्यालयात कामगारांना मी केबिनमध्ये झोपतो, असे सांगून ते आत गेले; मात्र, सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:च्या पिस्तुलातून छातीत डाव्या बाजूला गोळी झाडून आत्महत्या केली. आवाज आल्याने कामगारांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.

तसेच, हडपसर पोलिसांना घटनेबाबत कळविले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार, उपनिरीक्षक विजय झंझाड व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्याकडे ‘सुसाईड नोट’ मिळाली आहे. भागीदार असणार्‍यांनी फसविले असून, त्यामुळे मला आता दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या नोटमध्ये नमूद केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.