Wed, Jul 24, 2019 14:35होमपेज › Pune › फायनान्स कंपनीची दीड कोटींची फसवणूक

फायनान्स कंपनीची दीड कोटींची फसवणूक

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी 

बनावट खरेदीखत तयार करून फायनान्स कंपनीस दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करत विमानतळ पोलिसांनी पारस सुधीर शहा (38, रा. जयश्री अपार्टमेंट, सावीत्रीनगर, हिंगणे खुर्द, सिंहगडरोड)  अटक केली आहे. या दोघांनी आणखी काही फायनान्स कंपन्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला असण्याचा शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने पारसला 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. महेश सोनोनी (वय 43, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली. तर शहा याचा साथीदार अद्याप फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनोनी हे विमाननगर येथील इंडोस्टोर कॅपिटल फायनान्स कंपनीमध्ये रिजनल क्रेडीट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. संबंधित कंपनी ही मिळकतींवर कर्ज देते. 
त्यानुसार शहा व त्याच्या साथीदाराने कंपनीकडे दीड कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला होता. दोघांनी चिंचवड येथील विजय पांडुरंग नवाथे व गिरीश ललितकुमार नवाथे यांच्या नावावर असलेला एक बंगला शहा यांने आपण विकत घेणार आहोत, तो कंपनीकडे तारण ठेवणार आहोत असे  सांगून कंपनीकडे कागदपत्रे दिली. 

त्याच्याकडील कागदपत्रांची छाननी करून कंपनीने दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानुसार शहा यांनी ही रक्कम काढून घेतली. त्यानंतर कंनपीकडून बंगल्याची पाहणी करून मालकाशी चर्चा केल्यावर खरेदीखतावरील छायाचित्र व मूळ मालक यांचे छायाचित्र वेगळेच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर शहा यांनी मूळ मालकाच्या जागेवर दुसर्‍या व्यक्तींना उभे करून खोट्या स्वाक्षरी तयार करून बनावट खरेदीखत तयार केल्याचे समोर आले. 

कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोनोनी यांनी विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शहा व त्याच्या साथीदाराने आणखी दोन फायनान्स कंपन्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस विमानतळ पोलिस करत आहेत. दरम्यान, सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. 

 

Tags : pune, pune news, crime, Finance Company, fraud,