होमपेज › Pune › अखेर आरोग्यमंत्र्यांची ‘वायसीएम’ला भेट

अखेर आरोग्यमंत्र्यांची ‘वायसीएम’ला भेट

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:31AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत आहे. त्यावर आळा घालण्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अपयश येत आहे. साथीच्या आजारांबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाचेही काम धीम्या गतीने सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि. 28) अचानक वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. या वेळी रुग्णालयीन प्रशासनाला याबाबत तत्पर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. ‘पुढारी’मध्ये स्वाइन फ्लूबाबत वारंवार सविस्तर वृत्त देण्यात आले आहे. याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.  

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढली आहे. याची माहिती मिळताच आरोग्य मंत्री सावंत यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी दौरा नियोजित केला होता. सकाळी पुण्यातील आरोग्य भवन याठिकाणी वैद्यकीय विभागातील डॉक्टरांची बैठक घेतली.  त्यावर पुण्यात दहा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याचे समोर आल्याने त्यांनी डॉक्टरांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दुपारी एक वाजता पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.

वायसीएममध्ये महापालिकेच्या डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांनी शहरात स्वाइन फ्लूमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी वायसीएमच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता (आयसीयू) विभागातील रुग्णांच्या आरोग्याची माहिती घेतली. रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचे कामकाज त्यांनी पाहिले. तब्बल दोन तास मंत्री सावंत यांनी पालिकेच्या रुग्णालयातील कामकाजाची माहिती घेऊन डॉक्टरांना महत्वाच्या सूचना केल्या. 

या वेळी आयुक्‍तश्रावण हर्डीकर, अतिरिक्‍तआयुक्‍त डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, त्याचबरोबर डॉ. प्रदीप औटी, डॉ. संजय देशमुख, आरोग्य उपसंचालक आदी उपस्थित होते.